गुढीपाडवा आणि वसंत ऋतुचर्या | पुढारी

गुढीपाडवा आणि वसंत ऋतुचर्या

डॉ. अश्‍विनी एकतपुरे-राऊत 

गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला महाराष्ट्र आणि इतर काही ठिकाणी साजरा केला जातो. गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक आहे.

हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे भारतात माघ आणि फाल्गुन या महिन्यांत वसंत ऋतू असतो. इंग्रजीमध्ये वसंत ऋतूला स्प्रिंग म्हणतात. फेब्रुवारी उत्तरार्ध, मार्च, एप्रिल पूर्वार्ध या महिन्यांत वसंत ऋतू असतो. शाळांच्या क्रमिक पुस्तकांनुसार चैत्र आणि वैशाख हे वसंताचे महिने आहेत.
गुढीपाडव्याच्या येण्याने जसे मानवाच्या तनामनात आनंदाने नवचैतन्य फुलावे, तसं काहीसं वसंताच्या येण्याने सृष्टीत उत्साह, हर्ष, रंग यांची उधळण होते. समस्त सृष्टीला हसवणारा, रिझवणारा, तृप्त करणारा, नटवणारा, तापवणारा वसंत म्हणजेच ऋतुराज. भगवान श्रीकृष्णांनी गीतेत वसंताचे वर्णन करताना म्हटले आहे,  ऋतुनाम कुसुमाकर: कुसुमाकर म्हणजेच वसंतऋतू तो म्हणजे मीच।
कालिदासाने आपल्या ऋतुसंहारमध्ये वसंत ऋतूचे सुंदर वर्णन केले आहे.
सर्व प्रिये चारुतरं वसन्ते

वसंत ऋतूमध्ये सर्वकाही सुंदर आणि मधूर भासते. याच मोहक वांसताचे आरोग्यद‍ृष्ट्या फार महत्त्व आहे. प्रत्येक ऋतूनुसार मनुष्याने दिनचर्येचे पालन करायला हवे. परंतु, हल्लीची दिनचर्या सूर्य डोक्यावर आल्यावर सुरू होते, तिथे ऋतुचर्येचा दूरपर्यंत काहीच संबंध नाही. आपण भारतीय नशीबवान आहोत. कारण हजारो वर्षांपूर्वी लिहिलेले आयुर्वेदाचे ग्रंथ आपल्याकडे आहेत. आणि आयुर्वेदाचे प्रयोजनच आहे.

स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणं आतुरस्य व्याधिपरिमोक्ष: म्हणजेच निरोगी माणसाच्या आरोग्याचे जतन करण्यासाठी स्वस्थवृत्त, दिनचर्या, ऋतुचर्या व सद्वर्तन यांचा उहापोह करून निरोगी माणसाच्या आरोग्याचे रक्षण करणे आणि जर व्याधी उत्पन्‍न झाल्याच तर त्यापासून रोग्याची मुक्‍तता करणे. माघापासून पौषापर्यंत दोन -दोन महिन्यांचे सहा ऋतू अनुक्रमे शिशिर, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत. पहिल्या तीन ऋतूंनी उत्तरायण होते. त्यास आदानकाल अशी संज्ञा आहे. वर्षादी तन ऋतूंनी दक्षिणायन होते. त्यास विसर्गकाल म्हणतात.

उत्तरायण                                दक्षिणाय
1: मनुष्याचे बळ प्रतिदिन १ : मनुष्याचे बळ प्रतिदिन वाढते
कमी होत जाते
2 : अग्‍निगुण प्रधान.           2 : शितगुण प्रधान
3: कडू, तुरट, तिखट या रसांची वृद्धी होते. 3: आंबट, खारट, गोड रसांची वृद्धी होते.
कफश्‍चितो ही शिशिरे वसन्तीर्कांशुतापित:
हृत्वाग्नि  कुरुते रोगाततस्तं त्वरया जयेत॥
संदर्भ- अ.हृ. अध्याय 3

शिशिर ऋतूत संचित झालेला कफ वसंतात प्रखर सूर्यकिरणांनी प्रकुपित होतो. जाठराग्‍नी मंद होतो आणि पुढील संभाव्य कफविकार उत्पन्‍न होतात-

दमा, खोकला, ताप, भूक न लागणे, मळमळ, अंगदुखी, जडपणा, पोटदुखी, पित्त आदी. म्हणून वसंतात पहिल्यांदा कफाचा नाश करावा.
वसंत ऋतूमधील पथ्य आहार-विहार-

जुने जव, गहू, मध, ज्वारी, बाजरी, मका इत्यादी धान्यांचा आहार श्रेष्ठ ठरतो.
डाळी, मुळा, गाजर, पडवळ, मेथी, पालक, धने, आले यांचे सेवन करावे.
वमन (वासंतिक वमन), नस्य इत्यादी कर्म करून घ्यावीत.
व्यायाम, उटणे, मर्दन यांच्या वापराने कफनाशक होण्यास मदत होते.
स्नान केल्यानंतर कर्पूर, चंदन, केशर, अगरू यांचे उटणे लावावे.
शृड्गंवेराम्बु सारांम्बु मध्वम्बु जलदाम्बु वा।
संदर्भ-  अ. हृ. अध्याय 3
सुंठीचे पाणी, खदिरादिकांच्या गाभ्याचे पाणी, मधूमिश्रीत पाणी, नागरमोथ्याच पाणी यांचेही सेवन करावे.
थंड हवेच्या ठिकाणी, वृक्षांखाली, शांत वातावरणात मध्यान्हाचा वेळ घालवावा.
वसंत ऋतूमधील अपथ्य आहार- विहार-
शरद, ग्रीष्म, वसंत ऋतूमध्ये दही निषेध आहे. खायचे असल्यास मध, तूप, साखर, आवळा यांच्यासोबत खावे. रात्री दही खाऊ नये.
गुर्वम्लस्निग्धमधुरं दिवास्वप्नं च वर्जयेत॥23॥
संदर्भ- च. सं पूर्वार्ध अध्याय 6
पचायला जड, गोड पदार्थ, आंबट, स्निग्ध पदार्थ वर्ज्य करावेत.
दिवसा झोपू नये.
एका ठिकाणी अतिवेळ बसून राहू नये.
अशाप्रकारे ऋतुचर्येचे पालन केल्यास शरीराचे रक्षण होते. वसंतास ऋतूंचा राजा मानतात. संत ज्ञानेश्‍वर महाराजांनी वसंत ऋतूचे वर्णन केले आहे-
जैसे ऋतुपतीचे द्वार, वनश्री निरंतर,
वोगळे फळभार, लावण्येसी।

वसंत ऋतू आणि गुडीपाडवा यांचे नैसर्गिक, अध्यात्मिक आणि आरोग्यद‍ृष्ट्या महत्त्व :

गुढीपाडवा अतिशय शुभ दिवस मानला जातो. असे मानले जाते ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली आणि सत्ययुगाची सुरुवात झाली तो दिवस गुढीपाडव्याचा होता. ज्या दिवशी भगवान राम वनवास संपवून आणि रावणाचा वध करून अयोध्येत परतले तो दिवस गुढीपाडव्याच्या होता. गुढीपाडव्या दिवशी कडुनिंबाची पाने, साखर, ओवा, मीठ, हिंग, मिरे एकत्र खाल्ले जाते. यामुळे पचनास मदत होते. पित्ताचे शमन होते. चैत्र महिन्यापासून थंडी कमी होऊन ऊन वाढायला सुरुवात होते. कडुनिंबाची पाने अंघोळीच्या पाण्यात टाकल्याने शरीराला थंडावा भेटतो. त्वचाविकार नाहीसे होतात. सोबतच वसंत ऋतुचर्येचे

पालन केल्याने अनेक व्याधींपासून शरीराचे रक्षण होते. ज्याप्रमाणे शिशिरात पानगळती होऊन गुढीपाडव्याच्या दरम्यान नवी पालवी फुटते. वातावरण प्रसन्‍न असते आणि सभोवतालची झाडे टवटवीत दिसतात. त्याचप्रमाणे या गुढीपाडव्यापासून वसंत ऋतूचे पालन करत शरीर आणि मनाला टवटवी देण्याचा प्रयत्न करूया.

हेही वाचलंत का? 

Back to top button