

मडगाव : सांगेच्या शेळपे औद्योगिक वसाहतीजवळ असलेल्या दाभामळ येथे तब्बल दहा कोटी रुपये किमतीच्या व्हेल माशाची उलटी (अंब्ररग्रिस) च्या तस्करीचा सांगे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी सावंतवाडी येथील योगेश रेडकर (वय 40) याच्यासह साईनाथ शेठ (50, फोंडा) आणि रत्नाकांत कारापूरकर (60, मुरगाव) या तिघांना मोठ्या शिताफीने अटक करून त्यांच्याकडून व्हेल माशाची उलटी जप्त केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महागडे अत्तर किंवा सुगंधी उत्पादनाच्या निर्मितीसाठी वापरल्या जाणार्या व्हेल माशाच्या उलटीचे महत्त्व माहीत नसलेल्या या संशयित तस्करांनी केवळ दोन लाख रुपयांना त्याचा सौदा केला होता.
गुरुवारी मध्यरात्री ते शुक्रवारी पहाटे या दरम्यान, ही कारवाई करण्यात आली. देवमाशाच्या उलटीला अंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोट्यवधी रुपयांचा दर आहे. त्यामुळे मच्छीमारांना हाताशी धरून व्हेल माशाची उलटी मिळवणे आणि त्यांच्या हाती थोडेफार पैसे देऊन कोट्यवधींच्या मोबदल्यात त्या उलटीची देशाबाहेर विक्री करणे हे प्रकार मागील अनेक वर्षांपासून छुप्या पद्धतीने चालू आहेत.
सांगे पोलिस ठाण्यात नुकतेच बदली होऊन आलेल्या निरीक्षक दितेंद्र नाईक यांना देवमाशाच्या उलटीची तस्करी होणार असल्याची माहिती खबर्याने दिली होती. त्यानुसार, दांडो येथील जंक्शनवरून शेळपे पाणी शुद्धीकरण प्रकल्पावर जाणार्या रस्त्यावर पोलिसांनी सापळा रचला होता. व्हेल माशाची उलटी घेऊन एक व्यक्ती औद्योगिक वसाहतीपर्यंत येणार याचा संशय पोलिसांना होता. कारवाईची माहिती बाहेर पडल्यास संशयित हातातून सुटू शकतो याची कल्पना त्यांना होती. त्यामुळे अत्यंत गुप्तपणे या कारवाईचे नियोजन करण्यात आले होते.
सिंधुदुर्गातील रहिवासी असलेल्या योगेश रेडकर याने आपल्या दुचाकीवर घालून सुमारे साडेपाच किलो एवढी उलटी शेळपे औद्योगिक वसाहतीमधील एका कारखान्याजवळ आणल्यानंतर साईनाथ शेठ आणि रत्नकांत कारापूरकर हे आपली चारचाकी घेऊन रेडकर याच्याकडे पोचले. मात्र आधीपासूनच सापळा रचून बसलेल्या सांगे पोलिसांनी ते वाहनात बसून पळण्याच्या प्रयत्नांत असताना त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सुमारे साडेपाच किलो एवढी व्हेल माशाची उलटी व वाहतुकीसाठी वापरलेली कारगाडी पोलिसांनी जप्त केली. सायंकाळी त्या तिघांनाही रिमांडसाठी न्यायालयापुढे उभे करण्यात आले. पोलिस चौकशीत त्यांनी अद्याप आपले तोंड उघडलेले नाही.
मासळीच्या उलटीचा सौदा करण्यासाठी तिघेही सांगेच्या शेळके येथे का आले याचा शोध घेतला जात आहे. मासळीची उलटी सिंधुदुर्गातील रहिवाशाने आणल्याची शक्यता असून कदाचित पैशांच्या देवाण-घेवाणीवरून त्यांच्यातील सौदा फिस्कटला असावा. सायंकाळीच अटक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांची कसून चौकशी केली जाणार आहे. त्यांच्या व्यतिरिक्त आणखीही लोकांचा यात हात असू शकतो त्या दृष्टिकोनातून तपास सुरू असल्याची माहिती सांगे पोलिस निरीक्षक दितेंद्र नाईक यांनी दिली.
प्राथमिक चौकशीत रेडकर याने सिंधुदुर्गातून व्हेल माशाची उलटी आणल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. यापूर्वी सिंधुदुर्गातील देवगड येथे या दशकातील सर्वांत मोठी कारवाई करताना तब्बल साडेबारा किलो देव माशाची उलटी जप्त करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्या उलटीची साडेबारा कोटी एवढी किंमत आहे.
शेळपे औद्योगिक वसाहतीत एक फिश मिलचा कारखाना कार्यरत असून या कारखान्यातून प्रक्रिया केलेली मासळी कंटेनरच्या माध्यमातून दुसर्या ठिकाणी पाठवली जात आहे. ताब्यात घेतलेल्या तिघा संशयितांपैकी एकही व्यक्तीचा पाणी शुद्धीकरण प्रकल्प किंवा शेळपे औद्योगिक वसाहतीकडे थेट संबंध नसल्याने संशयाची सुई त्या फिश मिल प्रकल्पाच्या दिशेने वळली आहे. त्या दृष्टिकोनातून पोलिसांचा तपास सुरू आहे.