पणजी : सर्वांना सरकारी नोकरी हवी असते. त्यात चुकीचे काही नाही; मात्र सर्वांना सरकारी नोकर्या देणे कुठल्याही सरकारला शक्य नसते, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष व राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी केले आहे.
शनिवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना तानावडे म्हणाले, मनोहर पर्रीकर यांचा काळ वेगळा होता. त्या वेळी सर्व आमदार भाजपच्या केडरचे होते. आता तसे नाही. पक्षाच्या आमदारांची संख्या वाढली आहे. इतर पक्षांतून भाजपमध्ये आमदार आले आहेत. त्यांना पक्षाची धोरणे समजून घेण्यासाठी थोडा वेळ लागेल, असेही ते म्हणाले. अलीकडच्या काळात सरकारमधील मंत्री व आमदार सरकारविरोेधी वक्तव्ये जाहीरपणे करताना दिसतात, यावर मत विचारले असता, तानावडे यांनी काही नेत्यांना पक्षाची ध्येय-धोरणे समजून घेण्यास वेळ लागेल, असे उत्तर दिले.
नगर नियोजन खात्याचे मंत्री विश्वजित राणे यांनी, ‘येत्या अडीच वर्षांत 22 हजार नोकर्या उपलब्ध करा व प्रत्येक मतदारसंघात 1 हजार नोकर्या द्या, न पेक्षा इतर पर्याय शोधू,’ असे जे वक्तव्य केले होते, त्यावर विचारले असता खासदार तानावडे म्हणाले, ‘सर्वांना सरकारी नोकर्या देणे अशक्य आहे. पक्ष अशा प्रतिक्रिया पाहून योग्य तो निर्णय घेईल. जेव्हा पक्ष वाढतो आणि तुम्ही दीर्घकाळ सत्तेत असता तेव्हा अपेक्षा वाढतात. राज्यात प्रत्येकाला सरकारी नोकरीच हवी असते; मात्र खासगी क्षेत्रातही गोव्यात बर्याच संधी असल्याचे सांगून बेरोजगारांनी त्या संधींचा लाभ घ्यावा.’ असे शेवटी तानावडे म्हणाले.