पणजी : गोवा आणि महाराष्ट्रात 100 हून अधिक घरफोड्या करून पोलिसांच्या हातावर तुरी देणारा अट्टल चोरटा अखेर जुने गोवे पोलिसांच्या जाळ्यात सापडला. या कुख्यात आंतरराज्य गुन्हेगाराला जुने गोवा पोलिसांनी महाराष्ट्रातील कवठेमहांकाळ (जिल्हा सांगली) येथून अटक केली. अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव लोकेश रावसाहेब सुतार, (वय 30, खटाव रोड, लिंगनूर, मिरज, जि. सांगली) असे आहे.
जुने गोवा पोलिस आणि कवठेमहांकाळ व सांगली ग्रामीण पोलिसांच्या संयुक्त कारवाईत कवठेमहांकाळ परिसरातून या अट्टल चोरट्याला अटक करण्यात आली. एला-जुने गोवे येथे राहणार्या सीमा बजरानाथ सिंग यांच्या तक्रारीवरून 28 सप्टेंबररोजी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारदार यांच्या मित्राच्या फ्लॅटमध्ये प्रवेश करून चोरट्याने अंदाजे 3 हजार रुपये आणि इतर मौल्यवान वस्तूंची चोरी केली होती. वेगवेगळ्या मार्गाने केलेल्या तपासादरम्यान संशयित अट्टल चोरटा लोकेश रावसाहेब सुतार असल्याची पोलिसांची खात्री झाली. त्यामुळे जुने गोवे पोलिस स्टेशनच्या पथकाने मिरज, सांगली आणि महाराष्ट्राच्या इतर भागांना 3 वेळा भेट दिली. अखेर कवठेमहांकाळ पोलिस स्टेशन आणि सांगली ग्रामीण पोलिस स्टेशनच्या पोलिस कर्मचार्यांच्या मदतीने संशयित आरोपीच्या मुसक्या आवळून जुने गोवा पोलिस ठाण्यात आणण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने आपणच चोरी केल्याची कबुली दिली. पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांच्या मार्गदर्शनाखाली जुने गोवे पोलिस निरीक्षक सतीश पडवळकर व सहकारी पुढील तपास करत आहेत.
संशयित आरोपी लोकेश सुतार याने अपस्माराचा झटका (फिट्स) आणि मानसिक आजारी असल्याचे भासवून इतर प्रकरणात अटक टाळण्यासाठी प्रयत्न केले. परंतु त्याला बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात आणि मानसोपचार व मानवी वर्तन संस्थेत त्याची तपासणी करण्यात आली. त्यावेळी तो तंदुरुस्त असल्याचे प्रमाणपत्र त्यांच्याकडून देण्यात आले.