

पणजी : घरगुती किंवा कमी दाबाच्या वीज ग्राहकांना दिवसाचा वेळ (टीओडी) योजना लागू केली जाणार नाही, तर 2015 पासून ती औद्योगिक क्षेत्रातील वापरकर्त्यांसाठी लागू आहे. हे काही नवीन नाही. पुढील डिसेंबरपासून सरकारी कार्यालयात स्मार्ट मीटरची अंमलबजावणी खासगी एजन्सीमार्फत सुरू केली जाणार आहे व तीन वर्षांनंतर त्याची प्रत्यक्षात सुरुवात होईल, असे स्पष्टीकरण वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी आज दिले. त्यामुळे या दरवाढीसंदर्भातचा पूर्ण अभ्यास करूनच त्यावर बोलावे, असा सल्ला त्यांनी काँग्रेस व ‘आप’ला दिला आहे.
राज्यातील सर्वसामान्यांवर टाईम ऑफ डे या योजनेचा कोणताच परिणाम होणार नाही. त्याची अंमलबजावणी स्मार्ट मीटर बसविल्यानंतर तीन वर्षांनंतर लागू होणार आहे. सध्या कमी दाबाच्या वीज ग्राहकांना 2.6 टक्के ते 5 टक्क्यांपर्यंत वीज दरवाढ होणार आहे. त्यामुळे सामान्यांना कोणताच अधिक भार पडणार नाही. वीज बिलात 0 ते 100 युनिटसाठी 2.6 टक्के, 101 ते 200 युनिटसाठी 3.6 टक्के, 201 ते 300 युनिटसाठी 5 टक्के तर 301 ते 400 युनिटसाठी 5 टक्के अशी दरवाढ झाली आहे. टाईम ऑफ डे ही योजना उच्च दाबाच्या जोडणीसाठी 2015 पासून लागू आहे. जेईआरसीने शिफारस केल्यानुसार औद्योगिक वापरकर्त्यांसाठी वीज बिलात दिवसांच्या वेळेत (टीओडी) 100 टक्क्यांवरून 80 टक्के, 130 टक्क्यांवरून 120 टक्के तर 120 टक्क्यांवरून 100 टक्के असे झाले आहे. मात्र, काहींनी या दरवाढीबाबत चुकीची माहिती दिल्याने गोंधळ झाला. मी माहिती देताना कोठेही कमी दाबाच्या वीज ग्राहकांसाठी टीओडी लागू होईल असे म्हटले नव्हते, असे मंत्री ढवळीकर यांनी स्पष्ट केले.
जेईआरसीच्या शिफारशीनुसार, टीओडी योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी तो स्मार्ट मीटर्स बसविल्यानंतरच लागू होणार आहे. यासंदर्भात खात्याचे अधिकारी यांच्याशी सल्लामसलत तसेच विचारविनिमय करूनच घेतला गेला आहे. त्यामुळे काँग्रेसने मुख्य अभियंत्यांना घेराव घातला म्हणून मंत्री घाबरत नाही. यापूर्वीही उच्च सुरक्षा क्रमांकपट्टी (एचएसआरपी) लागू करण्याचा निर्णय वाहतूक मंत्र्यांनी घेतला तेव्हाही विरोध झाला होता. अखेर त्याची अंमलबजावणी झाली. विरोधकांकडून कोणताही निर्णय सरकारने घेतला की त्याचे विनाकारण खच्चीकरण केले जाते, असे मंत्री ढवळीकर म्हणाले.
अंमलबजावणी डिसेंबरपासून
स्मार्ट मीटरची अंमलबजावणी येत्या डिसेंबरपासून सुरू होणार आहे. वीज खात्याने हे काम पूर्ण करण्यासाठी निवड केलेल्या खासगी एजन्सीला अडीच वर्षांची मुदत दिली आहे. आणखी सहा महिने ग्राह्य धरल्यास तीन वर्षांनी टाईम ऑफ डे योजनेबाबत पुन्हा विचार होईल. सध्या तरी सरकार ही योजना लागू करणार नाही. जेईआरसीने केलेल्या शिफारशीनुसार, नवीन वीज दरवाढ लागू झाली आहे, ती या ऑक्टोबर महिन्यापासून वीज ग्राहकांना लागू होणार आहे, असे मंत्री ढवळीकर म्हणाले.
मीटर घराबाहेरच हवे...
स्मार्ट मीटर्स हे नियमानुसार घराच्या किंवा फ्लॅटच्या बाहेरच असणे आवश्यक आहे. सध्या राज्यात सुमारे 6 लाख 80 हजार घरगुती वीज मीटर्सपैकी 6 लाख 45 हजार मीटर्स बाहेर आहेत. त्यामुळे मीटर रिडर्सना रीडिंग घेणे सोयीचे होते तसेच जर कोणी वीज चोरी करत असल्यास त्याची तपासणी करणे खात्याच्या अधिकार्यांना सोपे होते, अशी माहिती खात्याचे मुख्य वीज अभियंता स्टिफन फर्नांडिस यांनी दिली.