

फोंडा : फोंड्याचे आमदार आणि कृषीमंत्री रवी नाईक यांच्या निधनानंतर सोमवारी त्यांचे खडपाबांध येथील संपर्क कार्यालय खुले करण्यात आले. रवी नाईक यांच्या निधनानंतर प्रथमच हे संपर्क कार्यालय लोकांसाठी खुले करण्यात आले. रवी नाईक यांचे पुत्र रितेश आणि रॉय यांनी या संपर्क कार्यालयाचा ताबा घेऊन वडिलांचा लोकसेवेचा वारसा आम्ही पुढे चालवू, असे जाहीर केले.
फोंडा पालिकेचे दोनवेळा नगराध्यक्ष असलेले विद्यमान नगरसेवक रितेश हे फोंडा शिक्षण संस्था पीईएसचे सचिव आहेत. राजकारण आणि समाजकारण यांचा त्यांना मोठा अनुभव असून सामाजिक कार्यात त्यांचे उल्लेखनीय योगदान आहे. रॉय नाईक हे प्रथमच फोंडा पालिकेवर नगरसेवक म्हणून निवडून आले असले तरी राजकीय आणि सामाजिक क्षेत्राची त्यांना बर्यापैकी जाणीव आहे. सामाजिक कार्यात असलेले रॉय नाईक हे फोंडा पालिकेवर विक्रमी मतांनी निवडून आले होते.
रितेश नाईक म्हणाले, वडील रवी नाईक यांचे फोंडा आणि संपूर्ण गोव्यासाठीचे योगदान सर्वांना माहीत आहे. मात्र त्यांच्या अचानक निधनामुळे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून त्यांचे कार्य आम्ही दोघेही बंधू पुढे नेऊ. फोंडा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी कुणाला उमेदवारी द्यायची, हा निर्णय भाजप घेणार आहे, असे सांगताना आम्ही लोकसेवा सुरूच ठेवणार असल्याची ग्वाही रितेश नाईक यांनी दिली. रॉय नाईक म्हणाले, वडिलांचा जनसेवेचा वारसा आम्ही दोघेही बंधु एकजुटीने जपणार असून लोकांची कामे प्रथम या तत्त्वावर काम करू, अशी त्यांनी ग्वाही दिली.
तपोभूमीला दिली भेट!
सकाळी रितेश आणि रॉय यांनी कुंडई येथील तपोभूमीला भेट देऊन सद्गुरू ब्रह्मेशानंद स्वामींचे आशीर्वाद घेतले. यावेळी नगरसेवक आनंद नाईक तसेच हितचिंतक उपस्थित होते.
फोंडावासीयांनी घेतली रितेश, रॉय यांची भेट!
सकाळी कार्यालय खुले केल्यानंतर फोंड्यातील नागरिकांनी रितेश आणि रॉय यांची भेट घेतली. काहीजणांनी आपल्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. त्यावर चर्चा करून योग्य ते निर्णय घेण्यात आले. आम्ही फोंडावासीयांसाठी कायम उपलब्ध असू, अशी ग्वाही दोन्ही बंधूंनी भेटीसाठी आलेल्यांना दिली.