

म्हापसा : पीर्ण, बार्देश येथील डोंगर पठारावर सापडलेला मृतदेह हा कपिल चौधरी (19, उत्तर प्रदेश) या युवकाचा असल्याचे उघड झाले आहे. त्याचा खून करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाल्यानंतर कोलवाळ पोलिसांनी काही तासांत या खुनाचे गूढ उकलले आहे. हा खून रेंट अ कार चोरल्याच्या संशयातून करण्यात आला असून याप्रकरणी कांदोळी येथील रेंट कॅब व्यावसायिक गुरुदत्त लवंदे (31) या मुख्य सूत्रधारासह त्याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे.
शुक्रवारी सकाळी कानसा, थिवी व पीर्ण सीमेवरील पठारावर एक युवक निपचित अवस्थेत सापडला होता. स्थानिकांनी त्याला 108 रुग्णवाहिकेतून म्हापसा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.मृतदेहाची ओळख पटवून तपास सुरू केला असता हा प्रकार उघडकीस आला.
मिळालेल्या माहितीनुसार कपिल चौधरी याने गुरुदत्त लवंदे यांच्याकडून जीए 03 -एएच-5254 या क्रमांकाची थार जीप भाड्याने घेतली होती. दीपक ठाकूर यांच्या नावावरील बनावट पॅनकार्ड त्याने यावेळी सादर केले होते. थार जीपच्या वाहन ट्रॅकर वरून जीप बांदा, महाराष्ट्राच्या दिशेने जात असल्याचे समजल्यानंतर जीप चोरीच्या संशयावरून गुरुदत्त लवंदे यांनी आपल्या मित्रासह त्या जीपचा पाठलाग केला. अखेर ही जीप कणकवली, महाराष्ट्र येथे थार सापडली. त्यांनी कपिलला कारसह गोव्यात आणून थिवी येथे लाकडी दांड्याने आणि लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. त्यातच त्याचा मृत्यू झाला.
खुनानंतर संशयित आरोपींनी जवळच्या दुकानातून दारू विकत आणून अर्धी बाटली रिकामी करून कपिलच्या खिशात ठेवली. जेणेकरून त्याचा मृत्यू दारूच्या नशेत झाला असे वाटावे. त्यानंतर त्याचा मृतदेह पीर्ण-थिवी येथील पठारावर फेकून संशयितानी पळ काढला. कोलवाळ पोलिसांनी तपास करताना प्राथमिक चौकशीनंतर व्यवसायिक गुरुदत्त लवंदे याला ताब्यात घेण्यात आले. चौकशी दरम्यान त्याने सहकार्यांसह खून केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर सायंकाळी पोलिसांनी त्याचे साथीदार डायसन कुतिन्हो (31, वर्षे, रा. कळंगुट) व सूरज ठाकूर (21 वर्षे, रा. कांदोळी) यांना अटक करण्यात आली आहे. याचा अधिक तपास सुरू आहे.