

पणजी/डिचोली : म्हावळिंगे येथे अडीच वर्षांच्या मुलीची हत्या तिच्या आईनेच आपल्या प्रियकरासाठीच केल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे. डिचोली पोलिसांनी वेगवेगळ्या माध्यमातून पुरावे गोळे करताना फॉरेन्सिक विभागाचेही सहकार्य घेतले. या तपासांतर्गत काही संशयास्पद गोष्टी पोलिसांच्या निदर्शनास आल्या असून, त्यानंतर कसून चौकशी केली असता आईनेच गळा घोटून मुलीचा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रियकरासाठीच तिने हे कृत्य केल्याचे तपासात उघड झाले आहे.
अडीच वर्षांच्या मुलीचा गळा आवळून खून केल्याचा निष्कर्ष शव चिकित्सा अहवालात उघड झाला आहे. मुलीला मारहाण व त्यानंतर नाक व तोंड दाबल्याने तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी डिचोली पोलिसांनी मुलीची आई तसेच आईचा प्रियकर या दोघांना अटक करून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यांना आज न्यायालयाने दहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यांच्या प्रेमात अडथळा होत असल्यानेच मुलीचा काटा काढल्याची कबुली नितीनकुमार रमेश पुजार (उत्तर कन्नडा कर्नाटक) व नागम्मा रवी व्ही. (वय 28, चिक्कमंगळूर, कर्नाटक) दोघांनी दिली आहे.
मुलीची आई नागम्मा व तिचा प्रियकर नितीनकुमार पुजारा या दोघांच्यात ही मुलगी अडथळा ठरत असल्याने गेल्या काही दिवसांपासून खटके उडत होते. मुलीला मारहाणीचे प्रकार सुरूच होते. त्यातूनच हा खुनाचा गुन्हा या दोघांनी केला. नागम्मा ही पतीला सोडून प्रियकरासोबत गोव्यात आली होती. येताना तिने मुलीला सोबत घेतले होते. मात्र काही दिवसांनंतर प्रियकराने या मुलीचा द्वेष करण्यास सुरुवात केली. आईलाही मुलगी त्यांच्या प्रेमात अडथळा ठरत असल्याने तिचा हा अडथळा दूर करण्याचा तिने निर्णय घेतल्याचे आतापर्यंत त्या दोघांच्या जबानीतून उघड झाले आहे. दोघेही संशयित खून कोणी केला, हे स्पष्ट सांगत नाहीत. दोघेही एकमेकांवर हा गुन्हा ढकलत आहेत. मारहाण केल्याचे कबूल करत असले, तरी मृत्यू कसा झाला, याची माहिती देत नाहीत.
आठवडा बाजारात मुलीला घेऊन गेली होती
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिचोलीच्या आठवड्याच्या बाजाराला नागम्मा मुलीला घेऊन नितीनकुमार याच्याबरोबर गेली होती. तेव्हा ही मुलगी तिच्या खांद्यावरच होती. ती सायंकाळी घरी परतत असताना मुलीची हालचाल होत नसल्याने तिने एका दुकानावर नेले व तिच्या चेहर्यावर पाणी मारून उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र ती कोणतीच हालचाल करत नसल्याने लगेच 108 रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले. डिचोलीच्या आरोग्य केंद्रात नेले असता तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्यामुळे त्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.