पणजी : प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी 8 आमदारांविरुद्ध दाखल केलेल्या अपात्रता याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली आहे. सभापती रमेश तवडकर यांनी निकाल राखून ठेवला आहे. सोमवारपर्यंत लेखी बाजू सादर करण्याची मुभा याचिकादार तसेच प्रतिवादींना देण्यात आली असून लेखी बाजू सादर केल्यानंतर निवाडा दिला जाईल, अशी माहिती याचिकादाराचे वकील अभिजित गोसावी यांनी दिली.
काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये दाखल झालेल्या आठ आमदारांनी राजीनामा द्यायला हवा होता. कारण, ही पक्ष पातळीवर पडलेली उभी फूट नव्हती. त्यामुळे ते अपात्र ठरतात, असा दावा चोडणकर यांनी सभापती तवडकर यांच्याकडे केलेल्या याचिकेत केला आहे. त्यामुळे या आठ आमदारांना अपात्र करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यांच्यासह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर तसेच दक्षिण गोव्यतील काँग्रेस पदाधिकारी डॉम्निक नोरोन्हा यांनीही सभापतींकडे अपात्रता याचिका सादर केली होती. सभापतींनी नोरोन्हा यांची याचिका तांत्रिक मुद्यावरून यापूर्वीच फेटाळली आहे.
या याचिकेच्या सुनावणी वेळी जे युक्तिवाद मांडण्यात आले, ते सगळे लेखी स्वरूपात सोमवारपर्यंत सादर करण्याची सूचना सभापतींनी केली. लेखी बाजू सादर झाल्यावर निवाडा दिला जाणार आहे. निवाडा कधी जाहीर होणार हे स्पष्ट करण्यात आले नसला तरी सभापतींना सर्वोच्च न्यायालयाने 4 नोव्हेंबर ही अंतिम मुदत दिली आहे. त्यामुळे सभापतींकडून 4 नोव्हेंबर निवडा येणे अपेक्षित आहे.
दिगंबर कामत, मायकल लोबो, डिलायला लोबो, केदार नाईक, रूडाल्फ फर्नांडिस, राजेश फळदेसाई, संकल्प आमोणकर आणि आलेक्स सिक्वेरा यांनी सप्टेंबर 2022 मध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसमध्ये वेगळा गट स्थापन केल्याचे त्यांनी दाखवले होते. त्यानंतर या गटाचे भाजपात विलिनीकरण झाल्याचे दाखवण्यात आले होते.