

पणजी : राज्यात गुरुवारी मुसळधार पावसाने झोडपले. मागील दोन दिवसांपासून पडणार्या मुसळधार पावसाने पुन्हा कहर केला. मागील 24 तासांत विक्रमी 161.1 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. बहुतांश भागांत पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. या मुसळधार पावसामुळे राज्यातील धरण साठ्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.
मुख्य धरणे भरून वाहत आहेत, यामुळे राष्ट्रीय महामार्ग तसेच आंतरराज्य रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणची वाहतूक बंद करण्यात आली असून, या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. मोठे वृक्ष, झाडे घरांवर पडली आहेत. यासाठी प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना केल्या असून लोकांनाही योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
हवामान खात्याच्या वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या 24 तासात 161.1 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 17 जुनपासून 23 आणि 24 जूनचा पाऊस वगळता पाऊस सरासरीपेक्षा कमी, तुटीत पडत होता. मात्र केवळ कालच्या एका दिवसात पडलेल्या पावसाने ती तूट भरून निघाली आहे. उद्या 4 जुलैलाही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 5 जुलैपासून 9 जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
मागील 24 तासांत सर्वाधिक पाऊस धारबांदोडा येथे 229.4 मि.मी. इतका झाला आहे. त्या खालोखाल जुने गोवेत 187.4, मडगावात 186, म्हापशात 176.2, सांगेत 174.2, फोंड्यात 179, साखळीत 164.4, वाळपईत 156.7, केपेत 155, पणजीत 154.6, दाबोळीत 140.4, काणकोण 127.6, पेडणेत 117, मुरगावात 115.6 मि.मी. इतका विक्रमी पाऊस राज्यात झाला आहे.
राज्याला पाणीपुरवठा करणारी साळावली, गावणे, पंचवाडी ही धरणे भरली असून तिळारी धरण 82 टक्के भरल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. अंजुणे धरण15 ऑगस्टच्या दरम्यान भरते. आमठाणे धरणात पाणी साठवण्यात आलेले नाही. चापोली 78 टक्के साठा आहे.