

मडगाव : वादळी वार्यासह सुरू असलेल्या मुसळधार पावसाने दक्षिण गोव्याला गुरुवारी झोडपले. केपेच्या कुशावती नदीला आलेल्या पुरात पारोडा गाव पूर्णपणे जलमय झाला आहे. कोट्यवधी रुपये खर्चून पारोड्याचा रस्ता उंच करण्यात आला होता. पण पहिल्याच पावसात कुशावती नदीला आलेल्या पुरात गुडी-पारोड्याला जोडणारा तोच रस्ता पुराच्या पाण्यात बुडाला आहे. पुराचा प्रभाव केपे ते मडगावच्या वाहतुकीवर झाला असून काराळी भागांतील काही घरांमध्येही पुराचे पाणी शिरले आहे. रस्त्यावरील पाण्यातून प्रवास करण्यासाठी लोकांवर चक्क होड्या वापरण्याची वेळ आली आहे.
मागील चार दिवसांपासून दक्षिण गोव्यात पावसाने थैमान घातले आहे. सांगेच्या डोंगर भागांत पडलेल्या पावसाने सावरीसह मैनापी धबधबा ओथंबून वाहू लागला आहे. त्याचा परिणाम सर्व उपनद्यांवर झालेला आहे. बुधवारी कुशावती नदीला पूर आल्यामुळे नदीचे पाणी काराळीच्या पुलापर्यंत पोहोचले होते. मात्र, गुरुवारी पहाटे पुराचे पाणी पारोडा गावात पोचल्यामुळे पारोड्याच्या पुलासह केपे आणि मडगावला जोडणारा गुडी ते पारोडा हा सुमारे चार किलोमीटरचा रस्ता पाण्यात बुडाला आहे.
बुधवारी सायंकाळी नदीचे पाणी बरेच वाढले होते. चंद्रेश्वर पर्वतावर जाणार्या रस्त्यापर्यंत पाणी पोचले होते. रात्रभर तसाच पाऊस पडत होता त्यामुळे गुरुवारी सकाळीच पारोडा ते गुडी पर्यंतच्या रस्त्यावर पाणी आले. अचानक पाणी पातळीत वाढ होऊन सुमारे चार किलोमीटरचा मार्ग पाण्यात बुडल्यामुळे लोकांचे फार हाल झाले.
पुराचे पाणी लोकांच्या घरात शिरल्यामुळे तीन घरांचा संपर्क काही काळ तुटला होता. दरम्यान, पुराचे पाणी रस्त्यावरून वाहू लागल्याने लोकांना चक्क होड्यांचा वापर करावा लागला आहे. पारोडा रस्त्यावर आलेले पाणी गुरुवारी सायंकाळपर्यंत कमी झाले नव्हते.