

पणजी : राज्यात गाजलेल्या कॅश फॉर जॉब घोटाळ्यातील संशयितांपैकी मुख्य संशयित असलेल्या पूजा नाईकची ज्यांनी मुलाखत घेतली, त्यांना तिने विकत घेतले असावे, असा खळबळजनक आरोप वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केला आहे. त्यापैकी मुलाखतकाराच्या भावाला घोटाळा झालेल्या काळातच सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरी मिळाली आहे. ती पैसे देऊन होती की मेरिटवर, असा प्रश्न मंत्री ढवळीकर यांनी उपस्थित केला आहे.
पूजा नाईकच्या नव्या वक्तव्यानंतर गुन्हे अन्वेषण विभागाच्या गुन्हे शाखेतर्फे तपास सुरू आहे, जो कोणी आहे त्याच्यावर गुन्हा नोंदवून कारवाई होईल, असे ते म्हणाले. काही दिवसांपूर्वी ढवळीकर यांनी पूजा नाईकच्या या वक्तव्याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, ती करत असलेल्या आरोपांबाबत काहीच पुरावे तिच्याकडे नाहीत. तिने लोकांकडून सरकारी नोकरी देण्यासाठी पैसे घेतले होते ते लोक परत मागत असल्याने तिने ही नव्याने युक्ती लढविली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांना या घोटाळ्यातील मंत्री कोण असा प्रश्न विचारला गेल्यावर ते अधिक त्यावर भाष्य न करता निघून जात आहेत. या प्रकरणाचा तपास पोलिस करतील व लवकरच कोण तो हे उघड होईल, असे सांगत आहेत.
संशयित पूजा नाईक हिने या घोटाळ्यात मंत्री, आयएएस अधिकारी व पीडब्ल्यूडी अधिकारी हे सुमारे 17.68 कोटींच्या व्यवहारात गुंतल्याचा दावा केला व हे सर्वजण सध्या सरकारमध्ये आहेत, असे उघड केल्याने मंत्रिमंडळातील मंत्र्यांकडे लोक संशयाने पाहू लागले आहेत. आतापर्यंत तिची क्राईम ब्रँचमध्ये दोनवेळा व डिचोली पोलिस ठाण्यात चौकशी झाली आहे. तिने दिलेल्या माहितीची मुख्यमंत्र्यांनी दखल घेत पोलिसांना नव्याने गुन्हा नोंदवण्याचे निर्देश दिल्यानंतर आज तो नोंद झाला आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. मात्र हा गुन्हा कोणाविरुद्ध नोंद आहे याची माहिती उघड झालेली नाही. पोलिसांनीही ही माहिती गुप्त ठेवली आहे. संशयित पूजा नाईक हिने ज्या मंत्र्याचा घोटाळ्यात समावेश आहे, असे म्हटले आहे. तो सध्या सरकारमध्ये आहे असाही उल्लेख केला आहे. या मंत्र्याने 2012 साली त्या दोन अधिकार्यांची ओळख करून दिली होती.