

पणजी/फोंडा : फोंड्याचे आमदार तथा राज्याचे कृषिमंत्री रवी नाईक यांच्या निधनानंतर फोंड्याचे राजकारण गतिमान झाले आहे. पोटनिवडणूक नजीकच्या काळात घेण्यात येणार आहे. या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षातर्फे अनेक इच्छुक समोर आले असल्याने सत्ताधार्यांची डोकेदुखी वाढली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मगोपच्या भूमिकेकडेही लक्ष लागून राहिले आहे.
फोंड्यात ज्यांनी विविध विकास प्रकल्प राबवले त्या रवी नाईक यांना आदरांजली व्यक्त करण्यासाठी फोंड्यात रवी पुत्र रितेश नाईक यांना बिनविरोध निवडून देण्याचा आग्रह होत असतानाच आता इच्छुकांची जंत्री बाहेर पडत आहे. त्यामुळेच भाजपची उमेदवारी कोणाला द्यावी, याचा पेच सत्ताधार्यांसमोर निर्माण झाला आहे. येत्या 2027 मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी साधारण डिसेंबर महिन्यात जिल्हा पंचायत निवडणूक होणार आहे. त्याचवेळेला कदाचित फोंड्याची पोटनिवडणूक होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. सध्या या दोन्ही निवडणुका सत्ताधार्यांसाठी महत्त्वाच्या ठरल्या असून पुढील निवडणुकीचे भाकीत याच निवडणुकांवर ठरले आहे हे निश्चित.
भंडारी समाजाचा होणार विचार?
फोंडा मतदारसंघात भंडारी समाजाचे मतदार सर्वाधिक आहेत. अन्य बहुजन समाजही मोठ्या संख्येने असल्याने भंडारी समाजाचा विचार होऊ शकतो. मात्र, भाजप कार्यकर्त्यांचे मत महत्वाचे आहे. साधारण 60 टक्के मतदार हे बहुजन समाजाचे असून फोंड्याचा आमदार कोण हे या समाजावरच निर्भर असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
भाजपतर्फे इच्छुकांची वाढती संख्या
फोंड्यात भाजपतर्फे रितेश नाईक, विश्वनाथ दळवी तसेच रॉय नाईक हे रिंगणात आहेत. सध्या रितेश नाईक शांत आहेत; मात्र विश्वनाथ दळवी आणि रॉय नाईक यांनी आम्ही इच्छुक असल्याचे बोलून दाखवले आहे. अन्य दावेदारापैकी माजी खासदार नरेंद्र सावईकर आणि ओबीसी आयुक्त मनोहर आडपईकर यांचीही नावे चर्चेत आहेत. मात्र, त्यांनी अजून पत्ते खोललेले नाहीत. त्यामुळे भाजपची सध्या झाकली मूठ सव्वा लाखाची हीच नीती आहे. कारण ऐनवेळी कुणाचेही नाव जाहीर होऊ शकते.
भंडारी समाजाची मागणी काँग्रेस, आपने धुडकारली...
भंडारी समाजाने रवी नाईक यांचे पुत्र रितेश नाईक यांना उमेदवारी द्यावी व त्यांना बिनविरोध निवडून आणावे, अशी जाहीर मागणी केली आहे. मात्र भंडारी समाजाचे अध्यक्ष असलेल्या काँग्रेस व आम आदमी पक्षाने समाजाची मागणी झिडकारत पोट निवडणुकीत उमेदवार उतरवणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे भंडारी समाज केवळ राजकारण करण्यासाठी हवा. या समाजाच्या मागणीला काहीच किंमत दिली जात नाही हे आप व काँग्रेसने दाखवून दिले आहे, अशी भावना भंडारी समाज बांधवांमध्ये निर्माण झाली आहे.
काँग्रेस निवडणुकीवर ठाम
फोंड्याची पोटनिवडणूक काँग्रेस पक्षाने प्रतिष्ठेची बनवली आहे. फोंडा पोटनिवडणुकीत आपण उमेदवार उतरवणारच असे जाहीर केल्यामुळे ही निवडणूक होणारच असे स्पष्ट झाले आहे. अर्थातच काँग्रेस पक्षातर्फे फोंड्याचे नेते राजेश वेरेकर यांना उमेदवारी दिली जाईल हे नक्की आहे. सध्या राज्यात भाजपविरोधी वातावरण असून त्याचा फायदा काँग्रेसला होऊ शकतो, असे काँग्रेस वाल्यांचे मत आहे.
केतन भाटीकरांचे बंड?
मगो पक्षाचे फोंड्यातील नेते डॉ. केतन भाटीकर यांनी आपण अपक्ष उमेदवारी दाखल करू असे सांगून राजकीय वर्तुळात बॉम्बच टाकला आहे. रवी नाईक यांच्या निधनावेळी मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी रवी पुत्र रितेश नाईक यांना पहिली पसंती देत बिनविरोध निवडून देण्याचे आवाहन केले होते. त्यातच मगो पक्षाचे ज्येष्ठ नेते सुदिन ढवळीकर यांनीही भाजप जो उमेदवार देईल त्याला आमची पसंती असेल असे सांगितले होते. मात्र, अचानक केतन भाटीकर यांनी आपण निवडणुकीत उतरणार असल्याचे जाहीर केल्याने मगोचीही डोकेदुखी वाढली आहे. भाटीकर यांनी पक्षाविरुद्ध एकप्रकारे बंडच पुकारल्यामुळे मगोच्या नेत्यांना फेरविचार करावा लागणार हे निश्चित.
रॉय, सावईकर यांचे पक्षाकडे बोट
रवी नाईक यांचे दुसरे पुत्र नगरसेवक रॉय नाईक यांनाही आमदार व्हाचचे आहे. यापूर्वी त्यांनी मये मतदारसंघातून निवडणूक लढवली होती; मात्र ते पराभूत झाले होते. जर पक्षाने रितेशला वगळून आपणास उमेदवारी दिल्यास आपण विचार करू, अशी प्रतिक्रिया रॉय नाईक यांनी दिली, तर फोंड्यातून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले माजी खासदार अॅड. नरेंद्र सावईकर यांना त्यांच्या नावाच्या चर्चेबाबत विचारले असता पक्ष घेईल तो निर्णय मान्य असेल, असे सांगितले आहे.