

पणजी : राज्यात मागील काही महिन्यांपासून चर्चेत असलेला विषय म्हणजे मंत्रिमंडळातील फेरबदल होय. यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते, मंत्री, आमदार सक्रिय आहेत. हे फेरबदल विधानसभेच्या येत्या अधिवेशनापूर्वी व्हावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे विरोधकांनी विधानसभा पटलावर सरकारला घेरण्यासाठी रणनीती आखणे सुरू केले आहे.
राज्यात सप्टेंबर 2022 मध्ये काँग्रेसमधील आठ आमदारांचा गट भाजपमध्ये दाखल झाल्यापासून मंत्रिमंडळातील फेरबदलाविषयी जोरदार चर्चा सुरू आहे. त्यावेळी नव्याने आलेल्या काही आमदारांना लाभाची पदे देण्याचे भाजप नेत्यांनी सांगितले होते. मात्र, गेल्या अडीच वर्षांत अपवाद वगळता काहीच झाले नाही. आता मंत्रिमंडळातील फेरबदल अंतिम टप्प्यात आले असून, माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, मायकल लोबो किंवा डिलायला लोबो, संकल्प आमोणकर, सभापती रमेश तवडकर यांना मंत्रिमंडळात घेतले जाणार आहे. यासाठी केंद्रातील नेत्यांनी अनुमती दर्शवली आहे. यासाठीच्या बैठका अंतिम स्वरूपात आहेत. मात्र, याची अंमलबजावणी कधी होणार याबाबत स्पष्टता नाही.
दुसरीकडे विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 21 जुलैपासून सुरू होत असून, याकरिता सरकारला विविध मुद्द्यांवर घेरण्यासाठी विरोधकांनी तयारी सुरू केली आहे. विरोधी गटातील विविध पक्षांच्या आमदारांना एकत्रित करून एकत्रित रणनीती आखण्यात येत आहे. यासाठी विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांनी दोन बैठका घेतल्या आहेत. तिसरी बैठक मंगळवारी किंवा बुधवारी होण्याची शक्यता आहे. यात विविध प्रश्न, सरकारतर्फे मांडण्यात येणारे विधेयक, अधिसूचना, खासगी ठराव अशा मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.