पणजी : ई-लिलावाच्या पहिल्या फेरीत लिलाव झालेल्या बांदेकर कंपनीकडे असलेल्या मोन्त द शिरगाव ब्लॉक - 2 आणि फोमेंतो कंपनीकडे असलेल्या काले ब्लॉक 3 खाणींना केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाचे परवाने मिळाल्याने येत्या आठ दिवसांमध्ये इतर प्रक्रिया पूर्ण करून महिन्याअखेर या खाणी सुरू होतील, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.
राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारा खनिज व्यवसाय नव्याने सुरू होत आहे. वेदांता माईन्स कंपनीकडे असलेल्या डिचोली ब्लॉक -1 मधून आतापर्यंत 8 लाख टन खनिज उत्खनन करण्यात आले आहे. ई-लिलावात बांदेकर कंपनीकडे आलेल्या मोन्त द शिरगाव ब्लॉक-2 आणि फोमेंतो कंपनीकडे असलेल्या काले ब्लॉक 3 खाणींना केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाचे परवाने मिळेल आहेत. त्यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कन्सेंट टू ऑपरेट आणि ऑपरेट टू एस्टॅब्लिश हे परवाने घेणे गरजेचे आहे. त्यानंतर या कंपन्या सरकारबरोबर सामंजस्य करार करतील. सरकारच्या खाण आणि भूगर्भशास्त्र खात्याकडून त्यांना खनिज उत्खननाचे पत्र सादर करेल. ही प्रक्रिया आठवडाभरात पूर्ण होईल, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी वर्तविली आहे.
खाण आणि भूगर्भशास्त्र खात्याच्या वरिष्ठ अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार, खनिज आणि भूगर्भशास्त्र खात्यातर्फे पहिल्या 4 खनिज ब्लॉक्सचा 13 सप्टेंबर 2022 रोजी लिलाव जाहीर करण्यात आला होता. लिलाव प्रक्रिया पूर्ण करून 13 जानेवारी 2023 ला लिलावधारकांना पत्र देण्यात आली. 17 एप्रिल 23 ला दुसर्या 5 खनिज ब्लॉक्सचा लिलाव जाहीर करण्यात आला होता. या 5 खनिज ब्लॉक्ससाठीची लिलाव प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली आहे. यात लिलाव जिंकलेल्यांना संमतीपत्रे देण्यात आली आहेत. यापैकी ब्लॉक 1 डिचोली या वेदांता कंपनीकडून चालवण्यात येणार्या खाणी सुरू करण्यात आल्या आहेत. या खाणींमधून आतापर्यंत 8 लाख मेट्रिक टन उत्खनन करण्यात आले आहे. 31 सप्टेंबरपर्यंत पावसाळ्याच्या कारणास्तव उत्खननासाठी बंदी असते. मात्र स्थानिक वापरासाठी खनिज उत्खनन करता येते. त्याआधारे या खाणीतून 8 लाख मेट्रिक टनाचे उत्खनन केले आहे.
शिरगाव मये ब्लॉक 4 साळगावकर शिपिंग प्रा. लि. कंपनी, अडवलपाल - थिवी -ब्लॉक 5 फोमेंतो कंपनी, करमळे, कुडणे - ब्लॉक 6 जीएस डब्ल्यू स्टील, कुडणे -ब्लॉक 7 वेदांता लि., थिवी पिर्ण -ब्लॉक 8 केएआय इंटरनॅशनल लि. आणि सुर्ला सोनशी -ब्लॉक 9 जीएस डब्ल्यू स्टील लि. या खाणींचीही पर्यावरणीय परवान्यासाठीची प्रक्रिया सुरू आहे. ही परवानगी मिळाल्यानंतर पुढील सोपस्कार पार पाडून याही खाणी सुरू होणार असल्याचे खाण अधिकार्याने सांगितले.