पणजी : पुढारी वृत्तसेवा
राज्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या ऐवजी चिकनमातीच्या गणपती मूर्तींना प्रोत्साहन मिळावे यासाठी हस्तकला विकास महामंडळाच्या वतीने मूर्तिकारांना मिळणाऱ्या अनुदानात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. यंदा नोंदणी केल्यानंतर तात्काळ हे अनुदान मिळणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष प्रवीण आर्लेकर आणि सरव्यवस्थापक अजय गावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे एका अर्थाने चतुर्थीपूर्वीच मूर्तिकारांना गणपती बाप्पा पावला असे म्हणावे लागेल.
राज्यात चतुर्थीची धूम सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर हस्तकला विकास महामंडळाने मूर्तिकारांना दिलासा देण्याच्या उद्देशाने आणि चिकनमातीच्या मूर्तीला प्रोत्साहन देण्याकरता गणपतीच्या मूर्तीला मिळणारे १०० रुपये अनुदानात दुप्पट वाढ केली असून, आता प्रति मूर्ती २०० रुपये अनुदान मिळणार आहे. एका मूर्तिकाराला हे अनुदान २५० मुर्त्यांना घेता येणार असून ४ सप्टेंबर पूर्वी त्यांनी आपले अर्ज सादर करावयाचे आहेत. यापूर्वी हे अनुदान वर्षानंतर दिले जायचे. यंदा हे अनुदान तात्काळ देण्यासाठी राज्य सरकारने ५० लाख रुपयांऐवजी एक कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती ही अध्यक्ष आर्लेकर यांनी दिली आहे.
२०२१-२२ ला ३७५ लाभार्थींना ४९ लाख ९० हजार २०० रुपये अनुदान देण्यात आले होते. तर २०२२-२३ ला ३७६ मूर्तिकारांना ५१ लाख ६४ हजार ८०० रुपये अनुदान दिले गेले. तर गेल्या वर्षी २०२३-२४ ला ३८८ मूर्तिकारांना ५५ लाख ९२ हजार १०० रुपये अनुदान देण्यात आले. सध्या ४५० मूर्तीकरांनी या अनुदानासाठी अर्ज नेले आहेत. ही योजना केवळ गोव्यातील मूर्तिकारांसाठी असून मूर्ती बाहेरील राज्यातून आणल्या नाहीत असे लेखी हमीपत्र द्यावे लागणार आहे. या शिवाय स्वतःची गणपती बनवण्याची चित्रशाळा असणे आवश्यक आहे.