पणजी/मडगाव : दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातील 92 लिपिक (एलडीसी) पदाच्या भरतीबाबत उमेदवारांकडून नोकरीसाठी पैसे मागितले जात असल्याचा गंभीर आरोप गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी केला आहे. तर पैसे मागितल्याचे पुरावे सादर करावेत. आपण कारवाई करतो, असे आव्हान महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी दिले आहे.
महसूल खात्यांतर्गत दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात एलडीसी पदासाठी ऑक्टोबर 2023 मध्ये परीक्षा घेण्यात आल्या होत्या. फेब्रुवारी 2024 मध्ये पात्र उमेदवारांची स्किल टेस्ट घेण्यात आली. आता सात महिन्यानंतर या परीक्षांचे निकाल आले असून यातील काही उमेदवारांकडे नोकरीसाठी पैसे मागितले जात असल्याने ही संपूर्ण नोकर भरती प्रक्रिया रद्द करून त्याची चौकशी करावी, अशी मागणी आमदार सरदेसाई यांनी केली आहे. या संबंधी आपण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात व त्यांच्या सचिवांशी संपर्क साधला असता ते फोन घेत नसल्याचे आमदार सरदेसाई यांनी म्हटले आहे. त्यामुळे ‘नोकरीसाठी पैसे’ असा घोटाळा पुन्हा वर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बाबूश मोन्सेरात यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, नोकर भरती प्रक्रियेत आपण कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करत नाही. ही संपूर्ण प्रक्रिया भरती आयोगामार्फत होते. यापूर्वी अशा स्वरूपाचे पैसे घेतल्याचा आरोप सत्तेत असताना, मंत्री असतानाही केला होता. मात्र त्यावेळी आपण पुरावे सादर केले होते. त्यामुळे अशा स्वरूपाचे कोणी पैसे घेतले असतील तर त्याचे पुरावे सादर करावेत. जर कोणी पैसे घेतले असतील तर त्याच्यावर कारवाई केली जाईल.
कनिष्ठ कारकून पदांसाठी पहिली परीक्षा ऑक्टोबर 2024 मध्ये घेण्यात आली होती, त्यानंतर फेब्रुवारी 2024 मध्ये कौशल्य चाचणी घेण्यात आली होती. मात्र, निकाल जाहीर होण्यास सात महिने लोटले असून, उमेदवारांकडून रोख रकमेची मागणी करण्यात आल्याचे आता समोर आले आहे. या नोकर्या सुरक्षित करण्याच्या बदल्यात ही पैशांची मागणी झाली आहे, असा आरोप आमदार विजय सरदेसाई यांनी केला आहे.