

पणजी ः मिरामार येथील ला कांपाल परिसरात आज पहाटे 5 च्या सुमारास बंगल्याच्या पहिल्या मजल्यावरील खोलीला आग लागून सुमारे 2 लाखांचे साहित्य खाक झाले. ही आग इतर खोल्यांमध्ये पसरण्याआधीच अग्निशमन दलाच्या जवानांनी आटोक्यात आणली. या आगीमागील कारण अस्पष्ट असले तरी शॉर्टसर्किटचा संशय दलाच्या अधिकार्यांनी व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आग लागलेला बंगला हा अॅड. महेश माधवराव यांचा असून त्यामध्ये ते पत्नी व मुलासह राहतात. ही आग बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर मुलाचा बेडरूम आहे त्यामध्ये लागली. त्यांचा मुलगा काही दिवसांपूर्वी बाहेरगावी गेला असल्याने बेडरूमध्ये कोणीही नव्हते. बंगल्याच्या तळमजल्यावरील बेडरूममध्ये अॅड. महेश व त्यांची पत्नी झोपले होते. पहाटेच्या सुमारास खोलीत मोठ्याने आवाज येऊ लागल्याने हे जोडपे जागे तेव्हा खोलीमध्ये आगीने पेट घेतला होता. या घटनेची माहिती पहाटे 5.18 वा. अग्निशमन दलाला देण्यात आली. जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन ही आग विझवली. पणजी व मुख्यालयाचे दोन पाण्याचे बंब आगीवर नियंत्रणासाठी वापरण्यात आले.
अग्निशमन दलाच्या पणजी स्थानकाचे अधिकारी रुपेश सावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, या आग लागलेल्या खोलीतील बेड, वॉर्डरब तसेच ड्रेसिंग टेबल तसेच इतर साहित्य जळून खाक झाले. या खोलीध्ये महेश गायकवाड या कुटुंबाचे काही दागिने वॉर्डरोबमध्ये ठेवण्यात आले होते. या आगीत झालेल्या नुकसानीची माहिती बंगल्याच्या मालकाने दिली नसली तरी अंदाजे 2 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. ही आग कशामुळे लागली याची तपासणी करण्यासाठी वीज खात्याला पत्र पाठवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.