

मडगाव : सांतीमळ-सोनारवाडा येथील गोल्डन हाऊस चाळीत भाड्याने राहणार्या खगेश्वर साबर (वय 38) याचा खून करून गावी जाण्याच्या तयारीत असलेला संशयित सशिबंत बिभीषण मांझी (43) याला रेल्वे स्थानकावरून, तर रबी मांझी (28) याला बस स्थानकावरून पोलिसांनी अटक केली आहे. बारा तासांच्या आता मायणा-कुडतरी पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
खगेश्वर सबर हा कामगार राय गावातील सोनारवाडा येथे राहत होता. त्याचा मृतदेह चाळीतील भाड्याच्या खोलीत आढळला होता. खगेश्वर साबर हा ओडिशा येथील ओळखीच्या सशिबंत मांझी व रबी मांझी यांच्यासोबत सोनारवाडा राय येथील भाड्याच्या खोलीत राहत होता. 13 एप्रिल रोजी सकाळी खगेश्वर साबर याच्या खोलीतून रक्त बाहेर येत असल्याचे शेजार्यांना दिसल्यावर त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली आणि त्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यावर तपास सुरू झाला.
मायणा-कुडतरी पोलिसांनी 12 तासांच्या आत मूळ ओडिशातील संशयित सशिबंत बिभीषण मांझी व रबी मांझी यांना अटक केली. यानंतर खोलीत आलेला एक सहकारी घटनेच्या आधीच बाहेर गेल्याचे समजले. हे कामगार आपापसात बेटींग करायचे. दरम्यान, त्यांच्यात खटके उडाले आणि या वादातून दारूच्या नशेत हातापाई झाली. त्यावेळी खगेश्वर याच्या डोक्यावर दांडा मारल्याने तो जखमी होऊन जमिनीवर कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. त्याबरोबर ते दोघेही त्या खोलीतून पळून गेले होते.
पोलिसांनी तीन पथके तयार करून मडगाव रेल्वेस्थानक, कदंब बसस्थानक व इतर परिसरात तपासाला सुरुवात केली. गावी जाण्याच्या तयारीत असलेल्या संशयित सशिबंत मांझी याला मडगाव रेल्वे स्थानकावरून तर रबी मांझी याला बांबोळी परिसरात बसची वाट पाहत असताना ताब्यात घेण्यात आले. दोन्ही संशयितांना अटक करत त्यांची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळाल्यापासून अवघ्या 12 तासांच्या आत पोलिस निरीक्षक अरुण गावस देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली मायणा कुडतरी पोलिसांच्या टीमने या प्रकरणातील संशयितांना अटक केली.