गोवा : एका क्रू सभासदामुळे 'कॉर्डेलिया' जहाज अडकले समुद्रात - पुढारी

गोवा : एका क्रू सभासदामुळे 'कॉर्डेलिया' जहाज अडकले समुद्रात

पणजी, पुढारी वृत्तसेवा : मुंबईहून साधारण दोन हजार पर्यटकांना घेऊन ‘कॉर्डेलिया’ हे जहाज गोव्यातील मुरगाव बंदराकडे निघाले होते. यातील एका क्रू सभासदाची कोविड चाचणी सकारात्मक आल्याने जहाजात गोंधळ उडाला होता. त्यामुळे या जहाजाला बंदरावर येण्यास परवानगी नाकारण्यात आली होती.

बराच काळ हे जहाज समुद्रातच अडकून होते. १४७१ पर्यटक, ५९६ कर्मचारी असे एकूण २०६७ नागरिक या क्रूझमधून प्रवास करत होते. यातील एका क्रू सभासदाला ताप आला होता. त्याची कोविड अँटीजेन तपासणी केली असता ती पॉझिटिव्ह आली होती. त्या कर्मचाऱ्याला मार्गदर्शक तत्त्वानुसार सर्व प्रथम जहाजातून उतरून उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. त्याची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने या क्रूझमधील बहुतांश नागरिकांना कोविडची लागण झाल्याचे वृत्त सर्वत्र पसरले होते. या बातमीमुळे जहाजाला मुरगावपासून खोल समुद्रात नांगरून ठेवण्यात आले होते.

या जहाजावरील बऱ्याच जणांना कोविडची लागण झाल्याचे वृत्त पसरल्याने जहाजाच्या स्थानिक एजंटने स्पष्टीकरण दिले. मुंबईहून आलेले हे जहाज रविवारी सकाळी दहा वाजता मुरगाव बंदराच्या धक्क्यावर लागणार होते. परंतू, तत्पूर्वीच जहाजावरील एका कर्मचारीचा कोविड अहवाल पॉझिटिव्ह आल्याचा संदेश आला. त्या कर्मचाऱ्याला शनिवारपासून ताप येत होता. त्यामुळे जहाजावरच त्यांची अँटीजेन चाचणी करण्यात आली.

सदर माहिती जिल्हाधिकारी, आरोग्य संचालनालय, एमपीटी प्रशासन व इतर यंत्रणांना देण्यात आली. त्यानंतर जहाज धक्क्यावर न आणता समुद्रात ठेवले गेले. यासंबंधी सर्व यंत्रणांकडे चर्चा केल्यावर त्या सर्वांची चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परवानगी मिळाल्याने जहाज धक्क्यावर आणण्यात आले.

तसेच एका नामवंत इस्पितळातील २५ -३० कर्मचाऱ्याना त्या प्रवाशांची चाचणी करण्यासाठी जहाजावर नेण्यात आले. जोपर्यंत सर्वाचा अहवाल मिळत नाही तोपर्यंत कोणासही जहाजावरून खाली उतविण्यात येणार नसल्याचे त्या सूत्राने स्पष्ट केले होते. त्या जहाजावरील प्रवाशांबद्दल मार्गदर्शक तत्त्वानुसार सर्व खबरदारी घेण्यात आलेली आहे. त्यांनी दोन डोस घेतलेले आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली होती.

त्या सर्वाचा अहवाल निगेटिव्ह आला तर त्यांना जहाजावरून उतरविण्यात येईल. असे स्पष्ट करण्यात आले होते. आज या सर्वांचे अहवाल आल्यावर पुढील चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान सदर क्रूझ रविवारी धक्क्यावरच राहिल्याने जे प्रवाशी मुंबईला जाण्यासाठी आले होते. त्यांची मात्र गैरसोय झाली.

हेही वाचलंत का? 

Back to top button