Goa : "...तर गोवा लवकर मुक्त झाला असता" | पुढारी

Goa : "...तर गोवा लवकर मुक्त झाला असता"

पणजी, पुढारी वृत्तसेवा : “भारत 1947 साली स्वातंत्र झाला. मात्र गोवा तनंतर 14 वर्षांनी स्वतंत्र झाला. भारतीय मुक्त श्वास घेत होते. तर गोव्यातील जनतेवर पोर्तुगीज अमानुष अत्याचार करत होते. गोव्यातील स्वातंत्र्य सैनिकांनी  देशभरातील स्वातंत्रसैनिकांनी आणि  छत्रपती शिवाजी महाराज तसेच छत्रपती संभाजी महाराजांनीही गोवा मुक्तीसाठी प्रयत्न केले. तरी गोवा मुक्तीला विलंब झाला. सरदार वल्लभभाई पटेल आणखी काही वर्षे जिवंत राहिले असते तर गोवा (Goa) 1961 पूर्वी मुक्त झाला असता”, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.

19 डिसेंबर रोजी गोवा (Goa) मुक्तीच्या हीरकमहोत्सवी वर्षाचा समारोप सोहळा आणि 61 व्या मुक्ती दिनानिमित्त गोव्यात आयोजित केलेल्याआयोजित जाहीर कार्यक्रमात पंतप्रधान मोदी बोलत होते. यावेळी राज्पाल पी एस श्रीधरन, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर तसेच इतर मंत्री उपस्थित होते.

“सबका साथ, सबका विकास व सबका विश्वास, या धारणेतून देश बदलत आहे. पायाभूत सुविधा झपाट्याने उभ्या राहात आहेत. देशाचा सर्वांगिण विकास होत असून गोवा देशातील इतर राज्याच्या तुलनेने भरीवरित्या विकसीत झाला आहे. गोव्याने अवघ्या वर्षात राज्याचा भरीव विकास केला आहे. जर गोवा 1961 पूर्वी मुक्त झाला असता तर यापेक्षा अधिक विकास झाला असता”, असे वक्तव्यदेखील त्यांनी केले.

“450 वर्षे गुलामगिरीत राहूनही गोवेकरांनी गोव्याची (Goa) संस्कृती, परंपरा जपली. जिंदादिल गोवेकरांना इतर राजतील देशप्रेमी नागरिकांचे सहकार्य लाभले आणि हा मुक्तीलढा  प्रखर झाला. गोवेकरासोबतच इतर राजतील नागरिकांनीही गोवा मुक्तीसाठी प्राण दिले. राज्याने सर्वधर्मसमभाव जपला व एक भारत श्रेष्ठ भारत हे ब्रीदवाक्य खरे केले. मनोहर पर्रीकरांना राज्याला विकासाच्या एका उंचीवर नेले. डॉ. प्रमोद सावंतही तोच कित्ता गिरवत आहेत म्हणूनच तो सर्वत्र अव्वल ठरतो आहे”, असेही मत पंतप्रधान मोदी यांनी मांडले.

स्वातंत्रसैनिकांचा नावासह उल्लेख करत पंतप्रधानांनी रोमचे धर्मगुरू पोप फ्रान्सिस देशात येणार असून आपण त्यांना आमंत्रण दिले असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात त्यांनी गोवा (Goa) मुक्तीसाठी लढलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार केला.

650 कोटीच प्रकल्पांचे लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (रविवारी) राज्यात 650 कोटी खर्च करून उभारलेल्या पाच विकास प्रकल्पाचे लोकार्पण केले. यात केंद्र सरकारकडून मिळालेल्या निधीतून उभारलेले बहुतांश प्रकल्प आहेत. बांबोळी येथील ओ गोमेकॉ आवारातील 386 कोटीचे  500 बेडचे सुपर स्पेशलिटी इस्पितळ, मडगाव येथील 223 कोटीचे दक्षिण गोवा इस्पितळ, मोपा येथील कौैशल्य प्रशिक्षण केंद्र, 18 हजार घरांना 20 वर्षे वीज पुरवठा करणारा गॅस इन्सुलेटेड पावर प्लांट व नूतनीकरण करून वास्तू संग्रहालयात रूपांतर केलेला आग्वाद किल्ला यांचा यामध्ये समावेश आहे.

राज्याला 24 हजार कोटीचे प्रकल्प

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या स्वागत प्रास्ताविकात मोदींनी राज्याला भरीव सहकार्य केल्याचे सांगितले. त्यांनी तब्बल 24 हजार कोटी रुपयांचे प्रकल्प राज्याला दिले असल्याचे ते म्हणाले. त्यांच्यामुळेच राज्याचा चेहरामोहरा पालटला आहे. राज्याला विकासाच्या सर्वोच्च बिंदूवर पोहोचण्यास मदत झाली आहे असे म्हणत त्यांनी पंतप्रधानांप्रती आभार व्यक्त केले.

हुतात्मंना पंतप्रधानांचे नमन

राज्यात आल्यानंतर पंतप्रधानांनी सर्वप्रथम शहरातील आझाद मैदानाला भेट दिली. येथील हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र वाहून मुक्तीसाठी बलिदान दिलेल्या वीरांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी राज्यपाल पी. एस. श्रीधरन, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित होते. यानंतर त्यांनी मिरामार समुद्रकिनाऱ्यावर नौदल व हवाई दलाच्या विशेष कार्यक्रमांना हजेरी लावली.

हे वाचलंत का? 

Back to top button