पणजी; पुढारी वृत्तसेवा: कुठ्ठाळीच्या भाजप आमदार एलिना साल्ढाणा यांनी गुरुवारी सकाळी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. सायंकाळी साल्ढाणा यांनी दिल्ली गाठत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेत आम आदमी पक्षात प्रवेश केला.
राज्यात सध्या आमदारांनी राजीनामा देण्याचे सत्र सुरू झाल्याचा भास होऊ लागला आहे. मागील महिन्यापासून राज्यातील पाच आमदारांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यात लुईझिन फालेरो, रवी नाईक, जयेश साळगावकर, रोहन खंवटे आणि साल्ढाणा यांचा समावेश आहे. त्यामुळे राज्यातील आमदारांची संख्या 35 झाली आहे. चर्चिल आलेमाव यांनी राजीनामा न देता राष्ट्रवादी काँग्रेसचा गट तृणमूलमध्ये सामील करण्याचा अर्ज सभापती राजेश पाटणेकर यांना दिला होता. परंतु, अद्याप त्यावर निर्णय झाला नाही.
साल्ढाणा यांनी राजीनामा दिल्याने भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे. राज्यात होऊ घातलेल्या रेल्वे दुपदरीकरणाच्या कामाला साल्ढाणा यांनी कडाडून विरोध केला होता. त्याशिवाय तमनार वीज प्रकल्प असो की मोले अभयारण्यातून चौपदरीकरणाचा मार्ग असो, त्याला त्यांनी कडाडून विरोध करीत सरकारविरोधातच त्यांनी भूमिका घेतली होती. त्यामुळे भाजपचे राजशिष्टाचार मंत्री माविन गुदिन्हो यांनी कुठ्ठाळी मतदारसंघात लक्ष घालण्यास सुरुवात केली. त्यातूनच गुदिन्हो व साल्ढाणा यांच्यात शाब्दिक चिखलफेकही झाली.
भाजपला टाटा; साल्ढाणा 'आप' मध्ये
साल्ढाणा या मंत्रीपदीही राहिल्या असून, काँग्रेसमधून घाऊकपद्धतीने आलेल्या आमदारांमुळे त्यांचे मंत्रिपद गेले. त्यावेळीच त्या नाराज होत्या. पण त्यानंतर सरकारविरोधात अनेकदा भूमिका त्यांनी मांडली. असे असले तरी मध्यंतरी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कुठ्ठाळी मतदारसंघात सरकार आपल्या दारी या कार्यक्रमात साल्ढाणा यांच्या कार्याचे कौतुक केले होते. येत्या काही दिवसांत ते पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करू शकतात.
2012 मध्ये त्या आमदार झाल्या आणि मनोहर पर्रीकर व लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या मंत्रिमंडळात साल्ढाणा या एकमेव महिला मंत्री म्हणून कार्यरत होत्या. त्यावेळीही पर्रीकर यांनी घेतलेल्या काही निर्णयाविषयी साल्ढाणा यांची नाराजी लपून राहिली नव्हती. एलिना यांनी गुरुवार दुपारपर्यंत पुढील राजकीय भूमिका काय राहणार हे स्पष्ट केले नव्हते. सायंकाळी मात्र, राज्य निमंत्रक राहुल म्हांबरे, प्रवक्ते वाल्मिकी नाईक यांच्यासह साल्ढाणा यांनी दिल्ली गाठली. त्याठिकाणी त्यांनी केजरीवाल यांच्या उपस्थितीत आपमध्ये प्रवेश केला.
भाजप तत्त्व, धोरणे विसरलेला पक्ष : साल्ढाणा
माथानी साल्ढाणा यांनी ज्या पक्षाची तत्त्वे व धोरणे पाहून भाजपमध्ये प्रवेश केला होता, तो पक्ष आता उरला नाही, अशी उद्विग्न प्रतिक्रिया माजी आमदार एलिना साल्ढाणा यांनी राजीनामा सादर केल्यानंतर दिली. माजी पर्यावरणमंत्री एलिना म्हणाल्या की, 'बुधवारी पक्षाची बैठक झाली, त्यात एका ज्येष्ठ नेत्याने जी भाषा वापरली, ती क्लेशदायक आहे. पक्षात कोण येतो आणि कोण जातो, हे काहीच कळत नाही. कोणाचा कोणाला पायपोस नाही. जुने कार्यकर्ते दुखावले जात आहेत, त्यांचे खच्चीकरण होत आहे. रेल्वे दुपदरीकरणाच्या बाबतीत आपण केलेला विरोध हा रास्तच आहे. लोकांची अर्धी घरे व कुंपण पाडावे लागत आहेत.' मोले परिसरात येऊ घातलेले प्रकल्प हे अन्यायकारक असल्याच्या त्यांच्या निर्णयावर त्यांनी ठामपणा दाखविला. त्या प्रकल्पाला आपला विरोध कायम राहील, असेही त्यांनी निक्षून सांगितले.
राजीनाम्यापूर्वीच भाजपमधून हकालपट्टी : तानावडे
भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे म्हणाले, राजीनामा देण्यापूर्वीच भाजपने हकालपट्टी केलेल्या एलिना साल्ढाणांविरोधात भाजप कायदेशीर कारवाई करणार आहे. सायंकाळी दिल्लीत आम आदमी पक्षात प्रवेश केलेल्या एलिना यांनी भाजपचा राजीनामा मात्र रात्री दिला. आमदारकीचा राजीनामाही त्या सभापतींना सादर करू शकल्या नाहीत. त्याआधीच भाजपने त्यांची हाकालपट्टी केल्याची माहिती सभापतींना दिली होती.
तानावडे यांनी सांगितले, की भाजप सरकारमधील माजी मंत्री माथानी साल्ढाणा यांच्या आकस्मिक निधनानंतर एलिना यांना भाजपने कुठ्ठाळी मतदारसंघातून बिनविरोध निवडून आणले. 2017 मध्येही त्यांचा विजय होण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते वावरले. त्यांना राजकीय पार्श्वभूमी नाही. माथानी पक्षाचे चांगले नेते होते एवढीच काय ती त्यांची जमेची बाजू. त्यांना पक्षाने मंत्रीपदही दिले होते.
गेल्या दोन वर्षात त्यांच्या पक्षविरोधी कारवाया सुरू होत्या. सरकारी प्रकल्पांना त्यांचा विरोध होत होता. बुधवारी त्यांची पक्षातून हाकालपट्टी करण्याचा निर्णय झाला आणि त्यांना पक्षातून काढल्याची नोटीस विधानसभेचे सभापती राजेश पाटणेकर यांना गुरुवारी सकाळी 10 वाजून 10 मिनिटांनी बजावली होती. त्याची कुणकुण लागताच एलिना यांनी आमदारकीचा राजीनामा दिला.
त्यांची व सभापतींची भेट न झाल्याने त्यांनी राजीनामा कार्यालयात सादर करून त्या दिल्लीला रवाना झाल्या. तेथे आम आदमी पक्षात प्रवेश केल्यावर त्यांच्या लक्षात आले की भाजपचा आपण राजीनामाच दिलेला नाही. रात्री 8 वाजून 23 मिनिटांनी त्यांनी भाजप सोडल्याचे पत्र सादर केले आहे. त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करणाच आहोत.
हेही वाचलंत का?