गोवा : फेरीबोट कर्मचार्‍याचा बुडून मृत्यू | पुढारी

गोवा : फेरीबोट कर्मचार्‍याचा बुडून मृत्यू

फोंडा; पुढारी वृत्तसेवा : कुठ्ठाळी येथील फेरी धक्क्यावर सोमवारी झालेल्या एका दुर्घटनेत फेरीबोट कर्मचार्‍याचा बुडून मृत्यू होण्याची दुर्दैवी घटना घडली. मयत फेरीबोट कर्मचार्‍याचे नाव अक्षय ऊर्फ सीताराम तुळशीदास मुळवी (वय 40) असे असून तो मुळवीवाडा-गावणे बांदोडा येथील रहिवासी आहे. मडकई-कुठ्ठाळी जलमार्गावरील कुरतरी या फेरीबोटीवर अक्षय मुळवी मशिनिस्ट म्हणून कामाला होता.

कुठ्ठाळी फेरी धक्क्यावर असलेल्या या फेरीबोटीचे दोरखंड शाफ्ट व पंख्यात अडकल्याने ते काढण्यासाठी पहाटे पाचच्या सुमारास अक्षय पाण्यात उतरला होता, मात्र तो परत वर आलाच नाही. फेरीबोटीवरील कर्मचार्‍यांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला पण तो सापडू शकला नाही. त्यामुळे वेर्णा पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

त्यानंतर अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. त्याला शोधण्यासाठी नाविक दलाचीही यावेळी मदत घेण्यात आली. संध्याकाळी फेरीबोटीच्या खालीच अक्षयचा मृतदेह सापडला. दलाच्या जवानांनी मृतदेह पाण्याबाहेर काढून मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळात पाठवला. अक्षयची या फेरीबोटीवरून दुसरीकडे बदली झाली होती, मात्र बदलीपूर्वीच त्याचा दोरखंड काढण्याच्या नादात बळी गेला.

मयत अक्षय हा विवाहित असून त्याच्या पश्चात पत्नी व एक कन्या तसेच आई, भाऊ असा परिवार आहे. बांदोडा पंचायतीचे माजी सरपंच दिवंगत तुळशीदास मुळवी यांचा अक्षय पुत्र होत.

दोरखंडामुळे गेला अक्षयचा बळी

मडकई येथील देवी नवदुर्गेचा जत्रोत्सव असून सोमवारी या जत्रोत्सवाचा सांगता सोहळा होता. त्यामुळे या जलमार्गावर प्रवाशांची मोठी गर्दी असते. पहाटे दोरखंड शाफ्ट व पंख्याला अडकल्यामुळे अक्षयने दोरखंड सोडवण्यासाठी पाण्यात डुबकी मारली. मात्र तो परत आलाच नाही.

Back to top button