पणजी :पुढारी वृत्तसेवा मार्रा-पिळर्ण येथील व्हिला प्रकल्पातील एका व्हिलाचे मालक निरोथम सिंग उर्फ निम्स ढिल्लों (७७, पंजाब) यांच्या खून प्रकरणातील संशयित जितेंद्र साहू व नीतू रहुजा (रा. भोपाळ) या दोघा संशयितांना रेंट अ कारमधील जीपीएसच्या साह्याने वाशी मुंबई येथील टोलनाक्यावर पकडले. नवी मुंबई क्राईम ब्रांचच्या पोलिसांनी दोघांना अटक केली. पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांचे निम्स ढिल्लो हे चुलत भाऊ होते.
रविवारी, ४ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास खुनाची घटना उघडकीस आली. त्यांच्या घरी काम करणारे कामगार कामावर आले तेव्हा मालक निम्स हे आपल्या बेडवर निपचित पडलेल्या अवस्थेत त्यांना आढळले. ही घटना त्यांनी शेजारील व्हिलांच्या लोकांना तसेच ढिल्लो यांच्या हॉस्पिलिटी कंपनीच्या व्यवस्थापक सीमा सिंग यांना दिली. लगेच त्यांनी घटनास्थळी जाऊन पर्वरी पोलिसांना याची माहिती दिली.
ढिल्लों यांना भेटण्यासाठी त्यांचे काही पाहुणे शनिवारी रात्री आले होते. ते उशीरापर्यंत पार्टी करत होते. त्यानंतर रविवारी ढिल्लो हे संशयास्पदरित्या मृतावस्थेत आढळले.
पोलिस उपअधीक्षक विश्वेश कर्पे, निरीक्षक राहुल परब यांच्या चौकशीत त्यांच्या शरीरावर काही जखमा आढळल्या. तसेच त्यांच्या अंगावरील सोनसाखळी आणि हातातील कडा या सोन्याच्या वस्तूंसह मोबाईल तसेच रेन्ट अ कार गायब असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाचा वापर केला. रात्री उशीरा एक पुरूष व महिला व्हिलावर आल्याचे चौकशीतून उघडकीस आले. तर रेन्ट ए कार मालकाने जीपीएस बसवलेली आपली कार गोव्याबाहेर मुंबईच्या दिशेने निघाल्याची माहिती पोलिसांना दिली.
लगेच गोवा पोलिसांनी मुंबई क्राईम ब्रान्चच्या पोलिसांशी संपर्क साधून त्या गाडीचा तपशील दिला. वाशी टोल नाक्यावर ही गाडी ताब्यात घेतली. झडतीवेळी संशयितांकडे निम्स ढिल्लों यांच्या चोरीस गेलेल्या वस्तूही सापडल्या. जितेंद्र साहू व नीतू रहुजा अशी संशयितांची नावे आहेत. चौकशीवेळी खुनामागे या संशयितांचा हात असल्याचे स्पष्ट झाल्यावर क्राईम ब्रान्च पोलिसांनी दोघांना अटक केली. या संशयितांना गोव्यात आणण्यासाठी रविवारी संध्याकाळी पर्वरी पोलीस पथक नवी मुंबई येथे रवाना झाले आहे.
हेही वाचा :