गोवा : एसपी धानिया, एकोस्करांना नोटीस; मानवाधिकार आयोगाकडून होणार चौकशी | पुढारी

गोवा : एसपी धानिया, एकोस्करांना नोटीस; मानवाधिकार आयोगाकडून होणार चौकशी

मडगाव : पुढारी वृत्तसेवा : कुठल्याही न्यायालयाचा वॉरंट प्रलंबित नसताना केंद्र सरकारच्या आयबी विभागाला खोटी माहिती पुरवून लूक आऊट नोटीस बजावण्यास भाग पाडल्याबद्दल फ्लोएड कुतिन्हो यांनी केलेल्या तक्रारीची दखल मानवाधिकार आयोगाने घेतली आहे. दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक अभिषेक धानिया व मायणा कुडतरीचे तत्कालीन निरीक्षक सागर एकोस्कर यांना नोटीस बजावली आहे.
कुतिन्हो यांच्या तक्रारीवर २४ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार असून, धानिया हे आगमुट कॅडरचे अधिकारी असल्याने केंद्राने कुतिन्हो यांची तक्रार संघप्रदेश विभागाकडे वर्ग केली आहे.

केंद्रीय आयबी विभागाला खोटी माहिती पुरवून आपल्या विरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यास दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक अभिषेक धानिया यांनी भाग पाडले, अशी तक्रार नावेली येथील व्यावसायिक फ्लोएड कुतिन्हो यांनी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे केली होती.
याप्रकरणी कुतिन्हो यांनी राज्य मानवाधिकार आयोगाकडे आपली छळवणूक केली जात असल्याची तक्रार केली होती. त्या तक्रारीवर २४ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार असून पोलीस अधीक्षक धानिया आणि मायणा कुडतरी पोलीस निरीक्षकांना हजर रहाण्याची नोटीस आयोगाकडून काढण्यात आली आहे.

कुतिन्हो यांच्या विरोधात मडगाव न्यायालयाचा वॉरंट प्रलंबित असताना ते परदेशात गेल्याची माहिती या अधिकाऱ्यांनी आयबीला दिली होती. या प्रकरणी त्यांना न्यायालयात हजर करण्यासाठी लूक आऊट नोटीस जारी करावी, अशी मागणी पोलिसांच्या वतीने करण्यात आली होती. मात्र कुतिन्हो यांनी माहिती हक्क कायद्याच्या अंतर्गत त्या प्रकरणाची माहिती मागवली असता त्यांच्यावर कुठल्याही न्यायालयाचे वॉरंट नसल्याचे समोर आले होते.

मायणा कुडतरीचे तत्कालीन पोलिस निरीक्षक सागर एकोस्कर हे आपल्याला एका खोट्या प्रकरणात गुंतवू पाहत असून एकोस्कर यांच्या सांगण्यावरून धानिया यांनी ही खोटी माहिती केंद्रीय यंत्रणाना पुरविली असा कुतिन्हो यांचा आरोप आहे. घानिया आगमुट कॅडरमधील आयपीएस अधिकारी असल्याने ही तक्रार संघप्रदेश विभागाकडे वर्ग करण्यात येत असल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाचे अव्वल सचिव संजीव कुमार यांनी म्हटले आहे. या तक्रारी संदर्भात कुठलीही माहिती असल्यास ती पुराव्यासह १५ दिवसात वरील विभागाला सदर करावी, असेही कुतिन्हो यांना कळवले आहे.

Back to top button