गोवा : मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा : तृणमूल काँग्रेस | पुढारी

गोवा : मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा : तृणमूल काँग्रेस

पणजी : म्हादईचा प्रश्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मौन बाळगले आहे. त्यांनी या विधानाविरोधात भूमिका घ्यावी किंवा तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी तृणमूल काँग्रेसचे राज्य संयोजक समील वळवईकर यांनी केली. सोमवारी पणजी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मारियानो रॉड्रिग्स आणि राखी प्रभुदेसाई उपस्थित होत्या.

वळवईकर म्हणाले की, केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारने आगामी कर्नाटक निवडणुका जिंकण्यासाठी आमची जीवनरेखा असलेल्या आई म्हादईला विकले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही म्हादई प्रश्नाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यांनी ‘मन की बात’मध्ये पर्पल फेस्टिव्हलचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल गोव्याचे अभिनंदन केले; पण म्हादईवर शब्दही उच्चारला नाही.

प्रभुदेसाई म्हणाल्या की, अमित शहा यांनी गोवा सरकारच्या मदतीने म्हादई नदी वळवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट केले. ही मदत नेमकी काय होती हे मुख्यमंत्र्यांनी उघड करावे. मुख्यमंत्री असो की केंद्रीय गृहमंत्री, कोण खोटे बोलत आहे, याचा खुलासा सरकारने केला पाहिजे. रॉड्रिग्स म्हणाले की, या प्रश्नी रस्त्यावर उतरणारा तृणमूल हा पहिलाच पक्ष आहे. आम्ही संसदेत म्हादईचा मुद्दा तीन वेळा उपस्थित केला आहे. भाजप सरकारने गोमंतकीयांना गृहीत धरू नये, म्हादई वाचवण्यासाठी आम्ही कोणत्याही थराला जायला तयार आहोत.

Back to top button