गोवा : दोघा पोलिसांकडून कामगारास बेदम मारहाण | पुढारी

गोवा : दोघा पोलिसांकडून कामगारास बेदम मारहाण

फोंडा; पुढारी वृत्तसेवा : कुंडई औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्यात काम करणार्‍या नारायण राऊतराय या कामगाराला कुंडई आऊट पोस्टवर कार्यरत असलेल्या दोघा पोलिसांनी बेदम मारहाण केली. या दोन्ही पोलिसांचे आधी निलंबन करा आणि त्यांची सखोल चौकशी करून कारवाई करा, अशी मागणी कामगार नेते पुती गावकर यांनी केली. येथे बुधवारी (दि. 25) घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

फोंडा पोलिस स्थानकाशी संबंधित कुंडई येथील आऊट पोस्टवर कार्यरत असलेले आदित्य मांद्रेकर व विनय शिरवईकर यांनी चोरीच्या खोट्या आरोपावरून गोमंतक मजदूर संघ या आपल्या कामगार संघटनेशी निगडित कामगार असलेल्या नारायण राऊतराय याला ताब्यात घेतले व बेदम मारहाण केली. संबंधित कंपनीच्या अधिकार्‍याच्या सांगण्यावरूनच हा प्रकार झाला असल्याचे पुती गावकर म्हणाले. कामगारांना आपली संघटना योग्य न्याय देत असल्याने आपल्या संघटनेच्या कामगारांवर खोट्या तक्रारी दाखल करून त्यांना हैराण करण्याचा प्रकार या कंपनीच्या अधिकार्‍याने चालवला असल्याचेही पुती गावकर म्हणाले.

पुती गावकर यांनी फोंडा पोलिस उपअधीक्षकांकडे दिलेल्या तक्रारीनुसार कुंडईतील या कारखान्यात गेल्या 23 रोजी तांब्याची वायर चोरण्याचा प्रकार घडला. चोरीचा आरोप असलेल्या रोजंदारी कामगाराचा मोबाईल या कंपनीच्या अधिकार्‍याने आपल्याकडे ठेवला होता; मात्र नारायण राऊतराय याने या कामगाराकडे आपल्या सिलिंडरविषयी चौकशी केली असता, नारायण राऊतराय याचा क्रमांक मोबाईलवर आला. संबंधित अधिकार्‍याने पोलिसांना सांगून नारायणला ताब्यात घेण्यास सांगितले.

त्या कामगाराचा मोबाईल चोरीच्या आरोपावरून संबंधित अधिकार्‍याकडे असल्याचे नारायणला माहीत नव्हते, पण मोबाईल फोन केला म्हणून नारायण याला कुंडई आऊटपोस्टवरील आदित्य मांद्रेकर व विनय शिरवईकर या दोन्ही पोलिसांनी पोलिस आऊट पोस्टवर नेले व बेदम मारहाण केली. मारहाण केल्यानंतर सोडविण्यासाठी पाच हजारांची मागणी केली, मात्र प्रकरण दीड हजारांवर मिटले.

त्यानंतर जखमी नारायण कारखान्यात आला असता तो भोवळ येऊन खाली कोसळला. यावेळी नारायणला मडकई आरोग्य केंद्रावर उपचारासाठी दाखल केले असता, त्याला पोलिसांकडून झालेल्या मारहाणीमुळे अंतर्गत दुखापती झाल्यानेच त्याची प्रकृती बिघडली असल्याचा शेरा डॉक्टरांनी मारला व औषधोपचार करून तीन दिवसांची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. चोरीच्या खोट्या आरोपावरून नारायण राऊतराय या कामगाराला ताब्यात घेऊन त्याला बेदम मारहाण करण्याचा अधिकार या दोन्ही पोलिसांना कुणी दिला, असा प्रश्न करून त्या पोलिसांना त्वरित सेवेतून निलंबित करा, अशी मागणी गावकर यांनी केली आहे.

दीड हजार पोलिसाच्या मोबाईलवर?

नारायण राऊतराय याला बेदम मारहाण केल्यानंतर त्याला सोडवण्यासाठी पाच हजारांची मागणी आदित्य मांद्रेकर व विनय शिरवईकर या दोन्ही पोलिसांनी केली; मात्र आपल्याकडे तेवढे पैसे नाहीत, आपल्या हितसंबंधियांकडून दीड हजार रुपये देतो, असे सांगितल्यावर दोन्ही पोलिस तयार झाले आणि विनय शिरवईकर याच्या मोबाईलवर हे दीड हजार रुपये ट्रान्स्फर करण्यात आले. त्यामुळे लाचखोरीचा हा प्रकार उघडकीस आला असल्याने खळबळ उडाली आहे. फोंडा पोलिसांकडून कामगारांची सतावणूक करून त्यांच्याकडून पैसे हडप करण्याचे असे प्रकार घडत असल्याने राज्यात कायदा आणि सुशासन आहे काय, असा प्रश्नही गावकर यांनी केला आहे.

Back to top button