गोवा : म्हादई नदी वाचवा, डीपीआर तत्काळ मागे घ्या; विर्डी येथील सभेत ठराव | पुढारी

गोवा : म्हादई नदी वाचवा, डीपीआर तत्काळ मागे घ्या; विर्डी येथील सभेत ठराव

विर्डी (साखळी); विठ्ठल गावडे-पारवाडकर :  म्हादई नदीवर कळसा-भांडुरा धरणे बांधण्यासाठी कर्नाटकच्या विस्तृत प्रकल्प अहवालाला (डीपीआर) केंद्र सरकारने दिलेली परवानगी तत्काळ मागे घ्यावी, असा ठराव येथे जाहीर सभेत करण्यात आला. गोव्याची जीवनदायिनी असणार्‍या म्हादई नदीला कर्नाटकपासून वाचविण्यासाठी येथे सोमवारी जनसागराच्या उपस्थितीत सभा झाली. यावेळी राज्याच्या कानाकोपर्‍यातून गोमंतकीय उपस्थित होते. संतप्त लोकभावनेचा आदर करून गोव्यातील भाजप सरकारने केंद्र सरकारच्या दबावाला बळी पडू नये, असे आवाहनही या ठरावाद्वारे करण्यात आले.

राज्य सरकारने लोकांच्या या चळवळीला पाठिंबा द्यावा, अशी अपेक्षा या सभेतील वक्त्यांच्या भाषणातून अधोरेखित झाली. म्हादई नदीचे अस्तित्व टिकविण्यासाठी सर्व स्तरावर लढा द्यावाच लागेल आणि लोकांनाही या लढ्यामध्ये सक्रिय सहभाग द्यावा, असे आवाहन या सभेत करण्यात आले. म्हादई प्रश्नावर लक्षणीय संख्येने गोमंतकीयांनी एकत्र येऊन नदी वाचविण्याचा निर्धार व्यक्त केला.

साखळीजवळील विर्डी येथे आज ‘म्हादई वाचवा-गोवा वाचवा’ मंचतर्फे आयोजित जाहीर सभेसाठी सुमारे दहा हजारांच्या आसपास जनसमुदाय जमा झाला होता. विशेषत: दक्षिण गोव्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सभेमध्ये राजकीय नेत्यांची भाषणे कमी ठेवत सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरण तज्ज्ञांचे मार्गदर्शन जास्त ठेवल्यामुळे त्याचा सकारात्मक परिणाम झाला.

संबंधित बातम्या

एकूणच सभा ही म्हादई वाचविण्यासाठी झालेली एक चांगली सुरुवात म्हणता येईल. या सभेमध्ये म्हादई अभयारण्य गेली तीस वर्षे पिंजून काढणारे पर्यावरणप्रेमी प्राध्यापक राजेंद्र केरकर यांचे मुख्य भाषण झाले. त्यांनी गोव्यातील म्हादई व झुआरी या नद्या 20 हजार वर्षांपूर्वी एक होत्या. त्यांचे विभाजन कसे झाले आणि गोव्यात असलेल्या एकूण सर्वच नद्यांच्या परिस्थितीचे विवेचन करताना सर्व राजकीय नेत्यांनी आपापसातील मतभेद विसरून गोव्याच्या अस्मितेसाठी आणि गोवा वाचविण्यासाठी म्हादई प्रश्नावर एकत्र येण्याचे आवाहन केले. राजेंद्र केरकर यांनी कायदेशीर लढाईद्वारेच हा लढा जिंकता येईल, असे सांगत त्याचबरोबर लोकमताचा दबाव ही राजकीय नेत्यांवर टाकण्याची गरज व्यक्त केली.

काँग्रेसच्या नेत्या सुनिता वेरेकर यांनीही भाषणामध्ये मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजपवर जोरदार टीका टिप्पणी केली. इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी म्हादई बचावाच्या विषयाला महत्त्व देत त्या अनुषंगानेच भाषणे केली. त्यामुळे सभा परिणामकारक झाली असेच म्हणावे लागेल. मात्र, गोमंतकीयांनी हा जोश कायम ठेवण्याची गरज आहे. एकूणच सभेचे आयोजन आणि नियोजन व्यवस्थित होते. म्हादई वाचविण्यासाठी झालेली सुरुवात योग्य अशीच म्हणावी लागेल.

राजकीय भाषणबाजी कमी

राजकीय भाषणबाजी या सभेत कमी झाली. विरोधी सहा आमदार यावेळी उपस्थित होते. मात्र, त्यांचे प्रतिनिधी म्हणून एकमेव विजय सरदेसाई यांना भाषण करण्याची संधी आयोजकांनी दिली. विजय सरदेसाई यांनी मुख्यमंत्र्यांवर आणि एकूणच भाजप सरकारवर टीका केली. गोव्याच्या अस्मितेसाठी लढाई लढण्याचे आवाहन त्यांनी केले.

Back to top button