पणजी; पुढारी वृत्तसेवा : गेली अनेक वर्षे प्रलंबित असेलेलया बोंडला अभयारण्याच्या मास्टरप्लॅनला केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंदर यादव यांनी मान्यता दिली आहे. पर्यावरण मंत्री विश्वजित राणे यांनी ही माहिती दिली. त्यामुळे या अभयारण्याच्या नूतनीकरणाचा तसेच वाघांसह अन्य प्राणी आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तत्पूर्वी नोव्हेंबर 2022 मध्ये केंद्रीय अभयारण्य प्राधिकरणाने या योजनेला मंजुरी दिली होती.
राणे यांनी सांगितले की, बोंडला अभयारण्य हे एक अनोखे स्थळ बनविण्याचा आमचा प्रयत्न राहील. याद्वारे स्थानिक आणि पर्यटकांना आकर्षित करणार आहोत. अभयारण्य मुंबईतील भायखळा अभयारण्याप्रमाणे असणार आहे. नूतनीकृत बोंडला अभयारण्यात निसर्ग आणि स्थापत्यशैलीचा मिलाफ असणार आहे. याशिवाय विविध राज्यातून प्राणी आणण्यात येणार आहेत.
परिपूर्ण मास्टरप्लॅन करण्यासाठी वनखात्याच्या अधिकार्यांसोबत चर्चा करण्यात आली. यावेळी वनसंरक्षक आनंद जाधव, सौरव कुमार, परेश परब आदी उपस्थित होते. वनखात्याने पहिला मास्टरप्लॅन 2008 साली तयार केला होता. मात्र, प्राधिकरणाने त्यात बदल सुचवत तो नामंजूर केला होता. त्यानंतर त्यात बदल करून 2016 साली नवीन प्लॅनची तयारी सुरू झाली होती.
मास्टरप्लॅन मंजूर झाल्यानंतर येथे वाघांसह, पाणघोडा, अस्वल, भेकर, माकडे, सरडे आणि विविध जातींचे पक्षी आणण्यासाठी वनखाते प्रयत्न करणार आहे.