गोवा : झुआरी पूल लवकरच खुला; 32 टन वजनाचे 32 ट्रक ठेवून लोड टेस्टिंग | पुढारी

गोवा : झुआरी पूल लवकरच खुला; 32 टन वजनाचे 32 ट्रक ठेवून लोड टेस्टिंग

पणजी; पुढारी वृत्तसेवा : नव्या झुआरी पुलाचे लोट टेस्टिंग समाधानकारक झालेले आहे. येत्या काही दिवसांत या पुलाचे उद्घाटन होणार असून, पुलावर बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे नियम मोडणार्‍यांना थेट ऑटोमेटिक तालांव पाठवतील, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याचे नीलेश काब्राल यांनी दिली. आज, दि. 30 रोजी काब्राल यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे वरिष्ठ अधिकारी, वाहतूक पोलिस अधिकारी व झुआरी पूल बांधणार्‍या दिलीप बिल्डकॉम या कंपनीच्या पदाधिकार्‍यांसोबत बांधकाम सुरू असलेल्या झुआरी पुलाला भेट दिली व पाहणी केली.

झुआरी पूल दोन टप्प्यांत बांधला जात असून पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. चार पदरी रस्ता असलेल्या या एका भागावरून लवकरच वाहतूक सुुरू केली जाणार असल्याने आज या पुलाचे अंतिम लोड टेस्टिंग करण्यात आले. प्रत्येकी 32 टन वजनाचे 32 मोठे ट्रक ठेऊन ही चाचणी घेण्यात आली.

मंत्री निलेश काब्राल हे पथकासह उड्डाणपुलाच्या वेर्णा बाजूकडून पुलाकडे आले. व त्यानी लोड टेस्टींगची पाहणी केली. यावेळी बोलताना काब्राल म्हणाले की जुन्या पुलावरून अवजड वाहनांना बंदी असल्याने नव्या पुलावरून सर्व प्रकारची वाहने सोडण्यात येतील. मात्र पुलावर ओव्हरटेक करण्यास बंदी राहील. त्यासाठी शक्य तर मध्ये रोप टाकण्याची योजना आहे. जो नियम मोडील त्याला लगेच तालाव मिळेल. तशी व्यवस्था केली गेली आहे. पूल बांधलेली दिलीप बिल्डकॉम ही कंपनी पुलाची देखभाल 8 वर्षे तर जोड रस्त्यांची देखभाल 4 वर्षे करणार आहे. त्यानंतर साबांखात्याकडे देखभाल असेल. अशी माहिती काब्राल यांनी एका प्रश्नावर बोलताना दिली. 2024 पर्यंत दुसरे जोड पूल तयार होणार असल्याचे सांगून पुलाचे काम दर्जेदार व्हावे यासाठी खास दक्षता घेतल्याचे त्यानी सांगितले.

दरम्यान 11 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गोवा दौर्‍यावर येत असून ते धारगळ येथील आयुर्वेदिक इस्पितळाचे उदघाटन करतील तसेच पणजीत आयोजित जागतिक आयुर्वेद परिषदेच्या समारोप सोहळ्यात सहभागी होणार आहेत. पंतप्रधानांच्या या दौर्‍यावेळी झुआरीवरील या नवीन पुलाचे उदघाटन होण्याची शक्यता आहे. आणि त्यानंतर तो वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे.

Back to top button