गोवा : दक्षिणेत डॉन होण्याचे टोटोचे प्रयत्न | पुढारी

गोवा : दक्षिणेत डॉन होण्याचे टोटोचे प्रयत्न

मडगाव; पुढारी वृत्तसेवा :  कर्नाटकात मारला गेलेला कुख्यात गुंड अन्वर शेख ऊर्फ टायगर अन्वर याच्यानंतर दक्षिण गोव्याच्या गुन्हेगारी जगताचा डॉन होण्यासाठी उत्तर गोव्यातील कुप्रसिद्ध गुंड टोटो (टोपण नाव) सज्ज झाला आहे.

राजकीय पाठिंब्यावर उत्तर गोव्यात टोटोने गुन्हेगारीचे साम्राज्य पसरवले आहे. त्याने कुलाल ब्रदर्स टोळीच्या माध्यमातून दक्षिण गोव्यात खंडणी वसुली आणि इतर बेकायदा उद्योग सुरू केले होते. कुलाल ब्रदर्सने टोटोच्या राजकीय वरदहस्त आणि दहशतीचा गैरफायदा उठवत छोटा मोठा व्यवसाय करणार्‍या युवकांना लक्ष्य बनवण्यास सुरू केले. परिणामी कुलाल ब्रदर्सचा म्होरक्या विजय आणि त्याचे साथीदार विरोधी टोळीच्या हिटलिस्टवर आहेत.

कुलाल टोळीला संपविण्यासाठी मोठ्या रकमेची सुपारी देण्यात आल्याचे वृत्त आहे. अन्वर शेखने संपूर्ण दक्षिण गोव्यात दहशत निर्माण केली होती. खंडणी वसुली,ड्रग्ज अशा व्यवहारात त्याचा सहभाग होता. बलात्कार आणि मारहाण प्रकरणात त्याच्यावर डझनभर गुन्हे नोंद होते. गोव्यात गुन्हे करणे आणि कर्नाटकात मूळ गावी पळून जाणे ही त्याची कार्यपद्धती होती. गेल्यावर्षी मडगावात झालेल्या खुनी हल्ल्यानंतर अन्वर शेख याची त्याच्याच सौंदत्ती या गावात गेम करण्यात आली. रविवारी कोलवा सर्कलवर टोळी युद्धात जबर जखमी झालेला विजय कुलाल हा सुद्धा त्याकाळी अन्वरचा उजवा हात होता. अन्वर मारला गेल्यानंतर अनेकांना दक्षिण गोव्यावर राज्य करण्याची स्वप्ने पडू लागली होती. त्यातील कुलाल ब्रदर्स हे एक नाव आहे.

अन्वर मारला गेल्यानंतर विजयने उत्तर गोव्यातील कुख्यात गुंड टोटोशी जवळीक वाढवली होती. टोटोचे राजकीय कनेक्शन वरपर्यत असल्याने कित्येक गंभीर प्रकरणांतून तो सहीसलामत सुटला आहे. अन्वरचा भर बाजारात उघडपणे झालेल्या खुनाचा धसका दक्षिण गोव्यातील त्याच्या साथीदारांनी घेतला आहे. गेल्या वर्षभरापासून ते भूमिगत झालेले आहेत. व्हॅली डिकॉस्ताचे नाव गाजत होते; पण त्याला पिट एनडीपीएस कायद्याखाली तुरुंगात डांबले आहे. या स्थितीचा फायदा टोटोने आपले साम्राज्य दक्षिण गोव्यापर्यंत पसरवण्यासाठी कुलाल ब्रदर्सचा आधार घेतल्याची चर्चा आहे. विजयला मारहाण होताच त्याचे आणि टोटोचे एकत्रित छायाचित्रे समाजमाध्यमांत सामायिक होऊ लागली आहेत.

प्राप्त माहितीनुसार कुलालने खंडणीसाठी बर्‍याच जणांना सतावले आहेत. ज्यात क्लब मध्ये संगीत वाजवणार्‍या डिजेपासून ते गांजाच्या पुड्या विकणार्‍या छोट्या मोठया पेडलर्सचा समावेश आहे. त्याने गेल्या वर्षभरात सासष्टीत दबदबा निर्माण केला होता. टोटोच्या नावाचा वापर करून त्याने दहशत निर्माण केली होती.त्याच्यावर मारहाणीचे कित्येक गुन्हे नोंद आहेत. आता त्याचे विरोधक आता एकत्र येऊ लागले असून कोणत्याही क्षणी त्याची गेम होईल, अशी चर्चा असल्याचे सूत्रांनी सांगितले.

राजकीय कनेक्शनची चर्चा

रविवारी विजय कुलालवर झालेल्या खुनी हल्ल्यानंतर या गुंडांच्या राजकीय कनेक्शनची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. कुलाल हा टोटोच्या संपर्कात आहे आणि टोटोचे उत्तर गोव्यातील एका आमदराशी जवळचे नाते आहे. तर कुलालला मारहाण करणारेही सासष्टीतील एका आमदाराचे कट्टर कार्यकर्ते आहेत. या टोळी युद्धामध्ये सासष्टीत राजकीय रणकंदन प्राणघातक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Back to top button