गोवा : कळंगुट किनार्‍यावर दोन शॅक्स खाक | पुढारी

गोवा : कळंगुट किनार्‍यावर दोन शॅक्स खाक

म्हापसा; पुढारी वृत्तसेवा :  कळंगुट समुद्र किनार्‍यावरील दोन शॅक्स सोमवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत जळून पूर्णपणे भस्मसात झाले. यात सुमारे 50 लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. उमतावाडा-कळंगुट येथील समुद्र किनार्‍यावर सोमवारी मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत दोन्ही शॅक्स किमती सामानासह जळून खाक झाले. या आगीत अंदाजे पन्नास लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती शॅक्स मालक ब्रेन्सन तसेच मनोज नाईक यांनी दिली.

आगीने रौद्ररूप धारण केल्यानंतर शॅक्समधील कर्मचारी जीवाच्या आकांताने बाहेर पळाल्याने जीवितहानी टळली. या आगीची माहिती अग्निशमन दलास मिळाल्यानंतर पिळर्ण अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचेपर्यंत दोन्ही शॅक्स पूर्णपणे जळून खाक झाले होते, असे स्थानिकांनी सांगितले. सोमवारी मध्यरात्री ब्रेन्सन यांच्या शॅक्सला सर्वप्रथम आग लागली. काही क्षणात ही आग
शेजारच्या मनोज नाईक यांच्या मालकीच्या शॅक्सपर्यंत पोहचली. अवघ्या पंधरा मिनिटांच्या अवधीत दोन्ही शॅक्स जळून खाक झाल्याची माहिती शॅक्स मालकांनी दिली.

कळंगुटचे आमदार मायकल लोबो तसेच सरपंच जोजफ सिक्वेरा यांनी सकाळी घटनास्थळी पाहणी केली. आर्थिक संकटात सापडलेल्या शॅक्स मालकांना जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. जागतिक पर्यटन स्थळ असलेल्या कळंगुट किनार्‍यापासून कांदोळी ते बागा किनार्‍यांपर्यत दरवर्षी पर्यटन हंगामात स्थानिकांकडून मोठ्या प्रमाणात शॅक्स उभारण्यात येतात. एकप्रकारे स्थानिकाकडून उभारण्यात आलेला हा स्वयं रोजगारच असतो. मात्र एखादी आगीची दुर्घटना घडल्यास त्यावर तात्काळ उपाययोजना करण्यासाठी कुठलीच आवश्यक सेवा उपलब्ध नसते. त्यामुळे आगीसारख्या घटनांमध्ये शॅक्स व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. सरकारने या गोष्टीची दखल घेत या भागात आगीवर तात्काळ नियंत्रण आणणारी सेवा उपलब्ध करून द्यावी, तसेच नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त तात्काळ आर्थिक मदत मिळावी यासाठी आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे लोबो म्हणाले.

पंचायतीकडून प्रत्येकी लाखाची मदत

सरपंच जोसेफ सिक्वेरा म्हणाले की, आगीत जळून खाक झालेल्या दोन्ही शॅक्सच्या मालकांना पंचायतीतर्फे सानुग्रह मदत म्हणून प्रत्येकी एक लाख रुपये दिले जातील. तसेच त्यांना पंचायतीचे सहकार्य मिळेल.

संपूर्ण साहित्य बेचिराख

या आगीत दोन्ही शॅक्समधील म्युझिक सिस्टिम, सिसिटीव्ही कॅमेरा, लाकडी फर्निचर, फ्रिज, दारूच्या बाटल्या, किचनमधील साहित्य सर्व काही जळून खाक झाले. शॅक्समधील कर्मचार्‍याचेही सामान त्यात होते.

2020 मध्ये झाला होता सिलिंडरचा स्फोट

उमतावाडा – कळंगुट येथील किनार्‍यावर पर्यटन हंगामात दरवर्षी दाटीवाटीने नारळाच्या झावळांच्या सहाय्याने येथील व्यावसायिक तात्पुरते शॅक्स उभारतात. त्यामुळे या भागात चुकून जरी एखादी आगीची घटना घडली तर सरसकट अनेक शॅक्स आगीच्या भक्ष्यस्थानी पडतात. 2020 मध्ये तिवायवाडा – कळंगुट येथील किनार्‍यावर अशाच प्रकारे गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत सात शॅक्स भस्मसात झाले होते.

Back to top button