गोवा : इफफीच्या उद्घाटनाला सारा, कार्तिक, वरुण धवन येणार; दाक्षिणात्य कलाकारही येण्याची शक्यता | पुढारी

गोवा : इफफीच्या उद्घाटनाला सारा, कार्तिक, वरुण धवन येणार; दाक्षिणात्य कलाकारही येण्याची शक्यता

पणजी;  पुढारी वृत्तसेवा :  53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफफी) उद्घाटन सोहळ्याला अभिनेत्री सारा अली खान, अभिनेते कार्तिक आर्यन आणि वरुण धवन येणार आहेत. गोवा मनोरंजन संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वेतिका सचन यांनी ही माहिती दिली. याशिवाय काही दाक्षिणात्य कलाकारही येण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.

सचन म्हणाल्या की, आम्ही विविध कलाकारांच्या संपर्कात आहोत. यातील तिघांनी आम्हाला येणार असल्याची पुष्टी दिली आहे. याशिवाय यंदा प्रथमच ‘गाला प्रीमिअर’ विभाग सुरू करण्यात आला आहे. यामध्ये चित्रपटातील कलाकार रेड कार्पेटवर उपस्थित राहणार आहेत. यात अजय देवगण, श्रिया शरण, कीर्ती सनन , यामी गौतम व चित्रपट सृष्टीतील अन्य तारे , तारका येण्याची शक्यता आहे.

त्या म्हणाल्या, अनेकांना इफ्फी म्हणजे केवळ उद्घाटन आणि सांगता समारंभाला येणार्‍या सिनेतार्‍यांचे आकर्षण असते. मात्र, आम्हाला यासोबतच मास्टरक्लास, जागतिक चित्रपट प्रीमिअरद्वारे सिने रसिकांना, विद्यार्थ्यांना या क्षेत्राची अधिक माहिती द्यायची आहे. चित्रपट सृष्टीचा विचार केल्यास आपल्या देशामध्ये खूप प्रतिभा आहे. आपण इतर देशातील चित्रपट सृष्टीचा विचार केल्यास तंत्रज्ञानाच्या बाबत मागे पडत आहोत. एनिमेशन, तीन आयाम किंवा संकलन तंत्रज्ञानात अधिक कौशल्य विकसित करणे आवश्यक आहे. आम्ही सरकारतर्फे ही कमी भरून काढण्यासाठी प्रयत्न करत आहोत.

प्रतिनिधींसाठी कदंब बस, रिक्षाची सोय

सचन यांनी सांगितले की, नेहमीप्रमाणे यंदाही इफफीच्या प्रतिनिधींसाठी कदंब बस आणि रिक्षाची सोय उपलब्ध असणार आहे. यामुळे त्यांना पर्वरी येथील चित्रपटगृहात जाणे सोयीचे होणार आहे.

Back to top button