गोवा : बदनामीबद्दल विजय सरदेसाई यांना नोटीस पाठवणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा | पुढारी

गोवा : बदनामीबद्दल विजय सरदेसाई यांना नोटीस पाठवणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

पणजी; पुढारी वृत्तसेवा : गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष व फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांना नाहक बदनामी करण्याच्या प्रकरणी कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला आहे. सोमवारी मुख्यमंत्र्यांनी एका कार्यक्रमानंतर बोलताना हा इशारा दिला.

विजय सरदेसाई हे वारंवार नगर नियोजन खात्यामध्ये (टीसीपी) 2 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा जाहीर आरोप करत आहेत. त्यामध्ये मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचाही सहभाग असल्याचे वारंवार प्रसिद्धीमाध्यमांना सांगत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री डॉ. सावंत हे संतप्त झाले आहेत. त्यांनी सोमवारी याबाबत सांगितले की, आपल्यावर नाहक आरोप करून सरदेसाई हे लोकांची दिशाभूल करत आहेत. नगरनियोजन खात्याच्या फाईल थेट मुख्यमंत्र्यांकडे येत नाहीत याची जाणीव स्वतः नगर नियोजन खात्याचे मंत्री राहिलेले विजय सरदेसाई यांनाही माहीत आहे. तरीसुद्धा ते आपल्यावर वारंवार नाहक आरोप करत आहेत. आपण त्यांना कायदेशीर नोटीस पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आरोप केल्यानुसार त्यांच्याकडे असलेले घोटाळ्याच पुरावे सादर करावेत.

आपले मंत्रिपद काढून घेतल्यानंतर नगर नियोजन खात्याचे मंत्री झालेले बाबू कवळेकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या संगमताने नगर नियोजन खात्यात 2000 कोटीचा घोटाळा केल्याचा आरोप विजय सरदेसाई यांनी हल्लीच केला होता. त्यापूर्वीही त्यांनी असाच आरोप केला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या मुख्यमंत्र्येंनी सरदेसाई यांना कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचा इशारा दिला आहे.

Back to top button