गोवा : राज्यात कोकणी भवन उभारणार – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत | पुढारी

गोवा : राज्यात कोकणी भवन उभारणार - मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

मडगाव; पुढारी वृत्तसेवा :  राज्याची अस्मिता कोकणी भाषेमुळे टिकवून राहिली आहे. कोकणी साहित्यिकांचा यात सिहांचा वाटा असून सरकार सरकारकडून कोकणीच्या विस्ताराबरोबर साहित्य निर्मितीला प्राधान्य देत आहे. लवकरच कोकणी भवन उभारून कोकणी अकादमीचे त्यामध्ये स्थलांतर करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी केले.

येथील रवींद्र भवनात शुक्रवारी कोकणी भाषा मंडळाच्या हिरक महोत्सव साजरा झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते. यावेळी सन्माननीय अतिथी म्हणून डॉक्टर अश्विनी कुमार, कोकणी भाषा मंडळाचे अध्यक्ष अन्वेषा सिंगबाळ, उपाध्यक्ष पोब्र फर्नांडिस उपस्थित होते. कोकणीच्या विकासासाठी लवकरच मोठी साधन सुविधा उभी केली जाणार आहे, असे यावेळी डॉ. सावंत म्हणाले. काही शाळात शिक्षकांची कमतरता असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे. शिक्षण क्षेत्रातील ही त्रुटी भरून काढण्यासाठी लवकरच नवीन शिक्षकांची भरती करून शैक्षणिक स्थिती पूर्वपदावर आणली जाईल, असे ते म्हणाले.

कोव्हिड काळात भाषेसाठी कार्य करणार्‍या संस्थांना अनुदान देण्यात खंड पडला होता, आता राज्य कोविडपासून मुक्त होत असून यापुढे राजभाषा व संस्कृती टिकून ठेवण्यासाठी कार्यरत असलेल्या संस्थांना सरकारकडून पूर्वीप्रमाणे अनुदान दिले जाणार आहे असेही यावेळी डॉ. सावंत यांनी सांगितले.

या सोहळ्यानिमित्त ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक नागेश करमली, अ‍ॅड. उदय भेम्बरे, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावजो, नाटककार पुंडलिक नाईक, साहित्यिक मीना काकोडकर व हेमा नायक यांचा कोकणीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल मुख्यमंत्री हस्ते सत्कार करण्यात आला.

Back to top button