गोवा : माय-लेकासह सहा बांगलादेशीय ताब्यात; कळंगुट येथे चालवत होते रेस्टॉरंट | पुढारी

गोवा : माय-लेकासह सहा बांगलादेशीय ताब्यात; कळंगुट येथे चालवत होते रेस्टॉरंट

पणजी; पुढारी वृत्तसेवा : राज्यात मंगळवारी दिवसभरात सहा बांगलादेशींना ताब्यात घेतले. यात कळंगुट येथील झैका रेस्टॉरंटचे चालक आई व मुलगा बांगलादेशी आहेत. पोलिसांनी त्यांना गोव्यात बेकायदेशीरपणे राहण्याच्या गुन्ह्याखाली ताब्यात घेतले असून, कोलवा येथे दोघा बांगलादेशी नागरिकांनी त्यांच्या दोन मुलांसह ताब्यात घेऊन चौकशी सुरू झाली आहे. आजवर राज्यात 28 बांगलादेशीयांना ताब्यात घेण्यात आले आहे.

गोव्यात बेकायदेशीरपणे राहणार्‍या आणि व्यवसाय करणार्‍या बांगलादेशींच्या तपासाची मोहीम गोवा पोलिसांनी सुरू ठेवली आहे. कळंगुट, वास्को आणि कोलवा येथे काही बांगलादेशी बेकायदेशीरपणे बोगस कागदपत्रांच्या साहाय्याने राहत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कळंगुट येथील झैका रेस्टॉरंट चालवणारे आई व मुलगा बांगलादेशी असून ते बोगस कागदपत्रे करून कळंगुटमध्ये व्यावसाय करत आहेत. पोलिसांनी आई व मुलाला ताब्यात घेतले आहे. त्यांना हद्दपार होण्यापूर्वी हालचालींवर निर्बंध घालण्यात आले आहेत. पोलिस सूत्रांनी सांगितले की, झैका रेस्टॉरेंटचे चालक आई आणि तिच्या 19 वर्षीय मुलाकडे बनावट आधार कार्ड, भारतीय पासपोर्ट, पॅनकार्ड आणि कुटुंबाचा पत्ता आणि इतर कागदपत्रे आहेत. दुसरीकडे कोलवा येथे बांगलादेशचे नागरिक शाहीन करीम आणि फजल करीम हे आपल्या दोन अल्पवयीन मुलांसह गोव्यात कागदपत्रांशिवाय सापडले. त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वास्को पोलिस स्टेशनमध्ये भाडेकरू पडताळणीवर कडक मोहीम सुरू करण्यात आली आणि पोलिसांनी बांगलादेशी नागरिकांची उपस्थिती तपासण्यासाठी विविध घरांना भेट दिली.

वास्कोतील भाडेकरू पडताळणी न करणार्‍यांवर कडक कारवाई करणार असल्याचे वास्कोचे पोलिस निरीक्षक कपिल नायक यांनी सांगितले. पोलिसांना बांगलादेशचे नागरिक किंवा रोहिंग्यांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. असे सांगून भाडेकरू पडताळणी फॉर्म न भरलेल्या सुमारे 15 लोकांवर गुन्हे दाखल केल्याची माहिती नायक यांनी दिली. आम्हाला त्यांच्याकडून बनावट कागदपत्रे सापडली आहेत, जी इतर राज्यांमध्ये बनवली होती आणि बांगलादेश कार्डदेखील. त्यांना परदेशी प्रादेशिक नोंदणी कार्यालयासमोर (एफआरआरओ) हजर करण्यात आले असून, त्यांनी त्यांच्या हालचालींवर निर्बंध घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एक अहवाल तयार करून तो केंद्रीय गृह मंत्रालयाला पाठवला जाणार असल्याचे सस्केना यांनी सांगितले. बांगलादेशी नागरिक स्क्रॅप यार्ड चालवणे, जुने सामान व कचरा गोळा करणे, भंगार साहित्याचा व्यवहार करणे हे व्यवसाय करत आहेत. त्यामुळे राज्यातील सर्व भंगार अड्ड्यांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केल्याचे सक्सेना यांनी सांगितले.

Back to top button