गोवा : 200 लोकांना सव्वातीन कोटींचा गंडा; भामट्यास नेपाळ सीमेवर अटक | पुढारी

गोवा : 200 लोकांना सव्वातीन कोटींचा गंडा; भामट्यास नेपाळ सीमेवर अटक

पणजी; पुढारी वृत्तसेवा : पाच लाख रुपयांत सदनिका (फ्लॅट) देण्याच्या आमिषाने सुमारे 200 लोकांना सुमारे सव्वातीन कोटी रुपयांना गंडा घालणार्‍या नूर अहमद यास अटक करण्यात अखेर पोलिसांना यश आले. पोलिसांनी नेपाळच्या सीमेवर या भामट्याच्या मुसक्या आवळून त्याला गोव्यात आणले आहे. या प्रकरणी 200 पैकी 70 लोकांनी पोलिसांत तक्रारी दिलेल्या आहेत. फसलेले बहुतेक लोक वास्को येथील आहेत.

रायबंदर येथील गुन्हे अन्वेषण विभागाच्या कार्यालयात बुधवारी पत्रकार परिषदेत गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी ही माहिती दिली. यावेळी इतर पोलिस अधिकारी उपस्थित होते. नूर अहमद याने एका इमारतीमध्ये फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी पाच लाख सुरुवातीला द्यायचे व फ्लॅटचे काम पूर्ण होताच राहायला जायचे व इतर रक्कम दरमहा टप्प्या-टप्प्याने द्यायची, असे आमिष दाखविले होते. सुमारे 200 लोकांकडून त्याने प्रत्येकी 5 लाख घेतल्याचा अंदाज आहे. पोलिसांनी नूर अहमद याचा शोध सुरू केला होता. तो नेपाळकडे रवाना झाल्याचे समजल्यानंतर गोवा पोलिसांच्या गुन्हे विभागाचे पोलिस निरीक्षक लक्षी आमोणकर यांच्या नेतृत्वाखालील पथक त्या भागात रवाना झाले. या पथकाने नेपाळ पोलिस आणि पूर्व बिहारचे पोलिस अधीक्षक कुमार आशिष यांच्यासह तेथील पोलिसांच्या सहकार्याने नूर अहमदच्या मुसक्या आवळल्या. त्याच्यासह त्याची पत्नी नाहीर अहमद हिच्याविरोधातही दोन गुन्हे आर्थिक गुन्हे विभागाने नोंद झाले आहेत. आर्थिक फसवणूक विभागाकडे आत्तापर्यंत ज्या 8 केसेस उसखल झाल्या आहेत. या फसवणुकीच्या सहा केसेस या समान म्हणजेच आर्थिक आमिष दाखवून फसवून केल्यामुळे सामुदायिक आहेत, असे वाल्सन यांनी सांगितले.

Back to top button