ड्रग्ज पुरवठादार हॉटेल मालकाला अटक : हैदराबाद पोलिसांची गोव्यात कारवाई | पुढारी

ड्रग्ज पुरवठादार हॉटेल मालकाला अटक : हैदराबाद पोलिसांची गोव्यात कारवाई

म्हापसा : पुढारी वृत्तसेवा : अमली पदार्थ (ड्रग्ज) पुरविल्याप्रकरणी हैदराबाद पोलिसांनी बुधवारी वागातोर येथील प्रसिद्ध हॉटेल हिलटॉपचा मालक स्टिव्ह डिसोझा याला अटक केली. हैदराबाद येथील उस्मानिया युनिव्हसिटी पोलिस स्थानकात स्टिव्हच्याविरोधात अमली पदार्थविरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद आहे. याप्रकरणातील इतर संशयित फरार आहेत. हैदराबाद पोलिसांचे पथक त्यांच्या मागावर आहे. हैदराबाद पोलिसांनी यापूर्वी अटक केलेल्या प्रीतेश बोरकर याने अमली पदार्थ पुरविणार्‍या काही व्यक्तींची नावे सांगितली आहेत. त्यामुळे संशयितांचे धाबे दणाणले असून, अनेक संशयित भूमिगत झाल्याची माहिती मिळाली.

उस्मानिया युनिव्हर्सिटी पोलिसांनी 16 ऑगस्ट रोजी प्रीतेश बोरकर ऊर्फ काली (36, रा. मूळ रा. फोंडा, सध्या रा. हणजूण) याला हैदराबाद येथे अटक केली होती. प्रीतेश हा अमली पदार्थांचा पुरवठा करण्यासाठी गेला असताना पोलिसांनी अमली पदार्थांसह त्याला अटक केली होती. तो हणजूण येथे मनजूर अहमद या काश्मिरी युवकांसोबत अमली पदार्थाचा व्यवसाय करीत होता, तशी कबुली त्याने हैदराबाद पोलिसांना दिली. तो तुकाराम उर्फ  नाना साळगावकर, विकास उर्फ विकी नाईक, रमेश चौहान, स्टिव्ह डिसोझा, एडविन नुनीस व संजय गोवेकर यांच्याकडून अमली पदार्थ घेत होता, असे त्याने सांगितले होते. ही नावे त्याच्या डायरीतही सापडली होती. भाजप नेत्या आणि अभिनेत्री सोनाली फोगाट मृत्यू प्रकरणी कर्लीस बार अँड रेस्टारंटचे केअरटेकर एडविन नुनीस याला अटक केल्यानंतर हैदराबाद पोलिस कमिशनर सी.व्ही. आनंद यांनी याप्रकरणी गोवा पोलिसांनी सहकार्य केले नाही, असे विधान करून खळबळ माजविली होती. गोवा पोलिसांनी त्यांच्या विधानाचा इन्कार केला होता. एडविन नुनीस सध्या जामिनावर असला तरी सोनाली फोगाट खून प्रकरण सीबीआय पाहत असल्याने त्यांच्या चौकशीच्या चक्रात तो अडकला आहे. हैदराबाद पोलिसांचे सहा जणांचे पथक गोव्यात आले असून बुधवारी सकाळी त्यांनी स्टिव्ह डिसोझाला त्याच्या घरातून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला वैद्यकीय तपासणीसाठी नेले असता प्रकृती बिघडल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे त्याला म्हापसा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. स्टिव्ह याच्या अटकेमुळे इतरांचे धाबे दणाणले असून सध्यातरी ते भूमिगत झाल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

आठही संशयितांना अटक करणार

गोव्यातील अमली पदार्थ व्यवसायातील हे मोठे मासे आमच्या रडारवर आहेत. हैदराबाद येथे अटक केलेल्या बोरकर याने ज्या आठ
जणांची नावे दिली, त्या सर्वांना अटक तर होणारच आहे. आज फक्त स्टिव्ह डिसोझा याला अटक केली आहे, बाकीचे सध्या फरार आहेत.
यातील एडविन नुनीस याने हैदराबाद येथे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्याच्यावतीने वकील हैदराबाद कोर्टात हजर होते;
पण कोर्टाने त्याचा अटकपूर्व जामीन नाकारला. त्यामुळे त्यालाही अटक केली जाईल. गोवा पोलिसांचे चांगले सहकार्य मिळत आहे, अशी माहिती हैदराबाद पोलिस निरीक्षक राजेश व्यंकटेश्वर राव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

Back to top button