गोवा : पांढर्‍या सोन्यासाठी माफियांची झुंडशाही; वर्चस्वासाठी संघर्ष, गोळीबारापर्यंत मजल | पुढारी

गोवा : पांढर्‍या सोन्यासाठी माफियांची झुंडशाही; वर्चस्वासाठी संघर्ष, गोळीबारापर्यंत मजल

कुडचडे; विशाल नाईक : राज्यातील जुवारी, मांडवी, तेरेखोल यांसारख्या नद्यांमध्ये रेतीचा (वाळू) भरपूर साठा आहे. सरकारची बंदी असल्यामुळे रेतीचा उपसा करता येत नाही. रेती व्यवसायाला कायदेशीर मान्यता देण्याचा विचार करू, असे आश्‍वासन सरकारने दिले होते. मात्र, झाले काहीच नाही. रेतीला नदीतील पांढर्‍या सोन्याच्या खाणी म्हणतात. त्या लुटण्यासाठी टोळीयुद्ध सुरू झालेले आहे. त्याचाच परिणाम म्हणजे कुडचडेजवळ झालेला गोळीबार. या गोळीबारात एक कामगार ठार झाला, तर एक गंभीर जखमी झाला. सरकारने वेळीच दखल घेतली नाहीतर आणखी मुडदे पडू शकतात.

राज्यात रेती पुरवठ्याच्या तुटवडा आहे. बांधकाम कंत्राटदार असो, बांधकाम विकसक असो किंवा स्वतःचे घरकुल असावे असे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र काबाडकष्ट करून जगणारा सामान्य व्यक्‍ती असो.प्रत्येकाला रेतीची आवश्यकता आहे. महाराष्ट्रातून रेती आणून बांधकाम करणे सामान्य लोकांना परवडत नाही. त्यामुळेही रेती माफियांचे फावले आहे. झटपट पैसा कमवण्याच्या नादात कुडचडे, सावर्डे आणि पंचवडीतील कित्येक युवकांचे गट रेती व्यवसायात आहेत. अनियंत्रित व्यवसाय आणि एकमेकांच्या पुढे जाण्याच्या हव्यासापोटी या गटांत गावागावांत संघर्ष सुरू आहे. बाणसाय नदीत रेती उपसा सुरू असताना झालेला गोळीबार हा या संघर्षाचाच परिपाक आहे.

झुआरी नदीचा तो व्होडार पुलाखालून गेलेला फाटा म्हणजे रेती व्यावसायिकांसाठी सोन्याची खाण. हा फाटा संंतोषी माता मंदिराच्या जवळून शेल्डेपर्यंत बराच आत जातो. फाट्याच्या दोन्ही बाजूला शेती आणि ऊस बागायती आहेत. शेतातील पांढरी माती भरतीच्या वेळी फाट्याच्या पाण्यात उतरते. मुख्य नदीत मिळणार्‍या रेतीपेक्षा ही रेती पांढर्‍या रंगाची आहे. अनेक रेती वाहतुकदार हीच पांढरी रेती कुडाळची असल्याचे सांगून ग्राहकांना तीस ते पस्तीस हजार रुपयांमध्ये विकत आले आहेत.

या फाट्यात प्रवेश करण्यासाठी कुडचडेच्या खाणींवर येथे गेट आहे. त्या गेटमधून बंदर कप्तान खाते किंवा मरिन पोलिसांना आपली छोटी बोट आत घालता येत नसल्याने येथे कधीच करवाई झाली नव्हती. सुरुवातीला शेल्डे भागातील एक पारंपरिक रेती व्यवसायिक बांबूच्या सहाय्याने या फाट्यातून रेती काढत होता. नंतर येथेही उपसा पंपाचे ग्रहण लागले. शेल्डे भागातील एका युवकाने उपसा पंप घातल्यानंतर बाणसाय भागातील एका गटाला उपसा पंप घालण्याचे सुचले. दोघांमध्ये शर्यत सुरू झाली. फाट्यातील रेती काढण्यासाठी काकोडा भागातील युवक या व्यवसायात उतरण्याचा प्रयत्न करू लागले. त्यातून मारामार्‍याही झाल्या. मध्यंतरी कामगारांवर झालेला गोळीबार याच वादातून झाला होता. सोन्याची खाण असलेल्या या फाट्यात उतरण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत आहेत. फाट्यावर वर्चस्वासाठी एकमेकांचे रक्त सांडण्यासाठी सर्व जण आतुरलेले आहेत.

या व्यवसायातील तरूणांनी सातारा, रामनगर आदी भागात पंपाच्या सहाय्याने रेती कशी काढली जाते हे पहिले होते. 2019 मध्ये सर्वात प्रथम सावर्डेत हे मशीन आणण्यात आले. या मशीनला उपसा पंप असे नाव देण्यात आले. एका टिप्पर ट्रकाचे इंजिन वापरून हे यंत्र तयार करण्यात आले होते. त्याच्यासाठी खास होडीत तयार करून त्या होडीत ते यंत्र बसवण्यात आले. बहुदा हा गोव्यातील पहिलाच प्रयोग होता आणि तो यशस्वीही झाला. पारंपरिक पद्धतीने आठ ते नऊ तासात केवळ पाच ते सहा मीटर एवढाच माल काढता येत होता, उपसा पंपने केवळ वीस मिनिटांमध्ये जवळपास सोळा मीटर माल काढता येऊ लागला. दिवसभरात तब्बल वीस होडी भरू लागली.

उपसा पंपवरून भरपूर पैसे कमावता येतात, याची भूरळ युवकांना पडली होती. जो तो सातारा आणि सांगलीमधून उपसा पंप खरेदी करू लागला. नदीत एक ठिकाणी उपसा पंप लावले जात होते आणि जो तो आपल्या होड्या तिथे नेवून भरू लागला होता. उपसा पंपला फुटव्हॉल्व बसवून एक पाईप खोल नदीत सोडला जातो, तर दुसर्‍या बाजूने दुसरा पाईप होडीत सोडले जातो. रेती रिफाईन होऊन येत असल्याने त्यात दगड आणि शिंपल्या सापडत नव्हत्या. शिवाय त्या रेतीवर आणखी प्रक्रिया करण्याची आवश्यकता नसल्याने उपसा पंपच्या रेतीला मागणी वाढली होती. हातोहात रेती खपू लागल्याने सावर्डे, कापशे, पंचवाडी, कुडचडे आदी भागातील युवक या व्यवसायात उतरले. कोणाचे कोणावर नियंत्रण नव्हते. मनाला येईल तो दर आकाला जात होता. ओरिसा आणि झारखंडमधील कामगार या कामात तरबेज असल्याने हजारो कामगारांना बोलवले गेले. त्यांच्यावर कोणाचाही वचक नव्हता. गिर्‍हाईक ओढून घेण्यासाठी शर्यत सुरू झाली. उपसा पंपवर होडी भरण्यासाठी मारामार्‍या सुरू झाल्या.

अधिकार्‍यांचे खिसे गरम…सरकारला घंटा

दर दिवशी हजारो मीटर रेती काढली जात होती. स्थानिक अधिकार्‍यांचे खिसे भरत होते, पण सरकारच्या महसुलात एक कवडीही जात नव्हती. हळूहळू झुवारी नदीचे काठ उध्वस्त करण्यात आले. उपसा पंपची संख्या एवढी होती की रेती काढायला त्यांना नदीत जागा अपुरी पडू लागली. प्रत्येक होडी मागे सात हजार रुपये उपसा पंपचा मालक आकारत होता.दिवसभरात त्याची कमाई एक लाखांवर पोचत होती. झुवारी नदी अपुरी पडू लागल्यानंतर 2020 मध्ये त्यांनी आपले बस्तान कुडतरी मतदारसंघाच्या छोट्या फाट्यात हलवले. अवघ्याच काही महिन्यात नदीच्या या छोट्या फाट्याचा काठ कोसळून कोसळून फाट्याचे रूपांतर नदीत झाले. अधूनमधून एनजीओ आवाज उठवत होते, पण त्यांचे फारसे कोणाला पडून गेले नव्हते. बरेच माफिया या व्यवसायात उतरल्यामुळे भितीने लोक मूग गिळून गप्प राहायचे. कुडतरीत रेती माफियांनी धुमाकूळ घातला होता. कित्येक पंच, सरकारी कर्मचारी असे अनेक जण रेती व्यवसायात उतरले होते.

सर्वोच्च न्यायालयाने एनजीओच्या तक्रारींची दखल घेऊन बेकायदेशीर रेती उपशावर करवाई करण्यासाठी उपजिल्हाधिकारी स्तरावरील एक अधिकारी नेमला. संबधीत सर्व विभागाना सतर्क केले आणि तेव्हा कुठे 2021 च्या एप्रिलमध्ये बेकायदेशीर रेती व्यवसाय जुवारी नदीतून बंद झाला. झुवारीत रेती व्यवसायाला बंदी आल्यामुळे एकाच रात्रीत वाळु माफियांची दुकाने बंद झाली. सत्तरच्या आसपास बोटी जप्त करुन भंगारात काढल्या गेल्या. आजही रेती व्यवसायीक अधूनतमधून लोक प्रतिनिधीवर दबाव आणून रेती व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न करत आहे, पण न्याय व्यवस्थेशी पंगा घेणार कोण अशी स्थिती आहे.

2018 पर्यंत सुरू होता पारंपरिक रेती व्यवसाय

पूर्वी नदीच्या काठावर राहणारे लोक स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी पारंपरिक पद्धतीने रेती उत्खनन करत होते. पारंपरिक पद्धतीत नदीच्या काठाशी असलेली रेती काढण्यासाठी बांबूंचा वापर केला जाई. नदीच्या पाण्यात खोल बांबू घालून त्या बांबूंच्या मदतीने रेती काढली जाते. पारंपरिक पद्धतीने काढल्या जाणार्‍या रेतीमुळे नदीच्या काठाला नुकसान पोचत नव्हते. शिवाय बांबूंने रेती काढण्यासाठी काही मर्यादाही होत्या. ठराविक मीटरपर्यंतच रेती काढता येत असे.2018 पर्यंत राज्यांतील बहुतांश नद्यांमध्ये हीच परंपरा सुरू होती.

अति लालसा नडली…

सावर्डे पंचायतीच्या मागे रात्री शेकडो होड्या रेती घेऊन येत होत्या. सर्व काही सेट असल्याने रात्रभर रेतीची वाहतूक होत होती. पावसाळ्यात वळवई, पेडणे, आमोणा, विर्डी भागातील रेती व्यवसाय बंद होत असल्याने सावर्डेत रेतीवाल्यांना सुगीचे दिवस आले होते. 2700 रुपये प्रती मीटर प्रमाणे रेती विकली जात होती. अति लालसा नडली आणि न्यायालयाच्या निदर्शनास हा रेती व्यवसाया आणून देण्यात आला. ज्या ठिकाणी रेती विक्रीचा अक्षरशः बाजार होत होता त्याच जागी न्यायालयाच्या आदेशावरून रेतीच्या त्या होड्या कापून टाकल्या आहेत.

बंदर खात्याच्या बोटीची गोष्ट…

पोलिसांना पाण्यात करवाई करता येत नाही हे रेती उपसा मालकांना माहिती होते. त्यांनी थेट बंदर कप्तान खाते आणि मरिन पोलिसांकडे सलगी केली. बंदर कप्तान खात्याची बोट जुने गोवेवरून सुटली की कुडतरीत पोचायला त्या बोटला सहा तास लागतात हे रेतीवाल्यांना माहिती होते. त्यामुळे करवाईसाठी बंदर कप्तान खाते येईपर्यंत सर्व बोटी आणि उपसा पंप तेथून काढले जायचे.

शेकडो एकर शेती, नदीचा काठ उध्वस्त

उपसा पंपचे ते जुने यंत्र आता कालबाह्य होऊ लागले होते. मुंबईत काहींनी हायड्रोलिक पद्धतीचे यंत्र पहिले होते. ज्याची किंमत दहा लाख होती. पूर्वीच्या यंत्रापेक्षा हे यंत्र जास्त वेगवान होते आणि स्वयंचलितही. जुन्या यंत्रातील फूटव्हॉल्व पुन्हा पुन्हा नदीच्या तळाला रुतून बसत होते आणि तो भाग नवीन घालण्यासाठी साठ हजार रुपये खर्च येत होता. त्यामुळे एका गटाने हे यंत्र खरेदी केले आणि अवघ्या एक महिन्यांच्या आत शेकडो एकर शेत जामीन आणि नदीचा काठ उध्वस्त करून टाकला.

Back to top button