आता पाणी बिल भरा क्यूआर कोडने | पुढारी

आता पाणी बिल भरा क्यूआर कोडने

पणजी : पुढारी वृत्तसेवा: यापुढे पाणी बिल घरबसल्या क्यूआर कोडद्वारे भरता येणार आहे. शुक्रवारी इन्स्टिट्यूट मिनिझेझ ब्रागांझा येथे जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते या सेवेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल, जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर, मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल उपस्थित होते.

यावेळी देशात सर्वप्रथम हर घर जल उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण केल्याबद्दल राज्याला प्रमाणपत्र देण्यात आले. जल जीवन मिशन अंतर्गत हर घर जल उत्सव कार्यक्रमात मुख्यमंत्री म्हणाले की, वीज आणि पाणी बिलांसाठी क्यूआर कोड बिलिंग लागू करणारे गोवा देशातील पहिले राज्य ठरले आहे. याशिवाय स्मार्ट वॉटर मीटरिंगद्वारे महसूल गोळा करणारेही देशातील पहिले राज्य आहे. राज्यातील पाण्याची चाचणी 14 राष्ट्रीय प्रयोगशाळेतर्फे केली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनामुळे राज्यात हर घर जल यशस्वी झाले.

यावेळी गजेंद्र सिंह यांनी सांगितले की, 2019 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक घरात पिण्याचे स्वच्छ पाणी पोहोचवण्याचे जाहीर केले होते. ही संकल्पना आता हळूहळू सत्यात उतरत आहे. अशी सुविधा देणारे गोवा हे पहिले राज्य ठरले आहे. याशिवाय ग्रामीण भागात शौचालये, स्वछता यावर भर दिला जाणार आहे. हर घर जल या अभियानात गोव्याची कामगिरी खरोखर कौतुकास्पद आहे.

मंत्री काब्राल यांनी सांगितले की, राज्य सरकारने 100 टक्के हर घर जल उद्दिष्ट पूर्ण केल्यावर यापुढे नवीन प्रकल्प हाती घेणार आहे. यामध्ये 24 तास पाणी पुरवठा करण्यासाठी लवकरच 85 आणि 165 एमएलडीचे प्रकल्प सुरु करण्यात येतील. राज्यातील सांडपाणी वाहिन्यांचा प्रश्नही लवकरच सोडवला जाणार आहे. यासाठी आम्हाला अधिक जमिनीची आवश्यकता आहे.

म्हादईबाबत लक्ष घालावे

सुभाष शिरोडकर यांनी मंत्री गजेंद्र सिंह यांना म्हादई प्रकरणी लक्ष घालावे, अशी विनंती केली. राज्य सरकार पुढील पंचवीस वर्षे राज्यात पाण्याचा तुटवडा होणार नाही अशा योजना आखत असल्याचेही त्यांनी सांगितले.

वाचा : 

Back to top button