गोवा : तीन ठिकाणी चोरी; 25 लाख पळविले | पुढारी

गोवा : तीन ठिकाणी चोरी; 25 लाख पळविले

फोंडा; पुढारी वृत्तसेवा :  फोंडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी गुरुवारी धुमाकूळ घातला. रोख 13 लाख 37 हजारांसह सुमारे पंचवीस लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. तर चोरट्यांच्या मारहाणीत एक दुकानदार जखमी झाला. पोलिसांसमोर चोरट्यांनी आव्हान निर्माण केले आहे. चोरट्यांनी खांडोळा – माशेल येथे गणपती मंदिरात चोरी केली. तिस्क – उसगाव येथील दोन बँकांची एटीएम मशिन्स पळवून नेली. कुर्टी येथे एका मुलीची सोनसाखळी पळवली. कुंकळ्ये – म्हार्दोळ येथे दुकान फोडण्याचा प्रयत्न केला. तो असफल ठरला. चोरांनी दुकानदाराला जबर जखमी केले आणि पळ काढला.

प्रियोळ मतदारसंघातील कुंकळ्ये – म्हार्दोळ येथील नारायणवाड्यावरील एका दुकानात चोरट्यांनी घुसून चोरी करण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांचा आवाज ऐकून या दुकानाच्या मागच्या भागातील घरात राहत असलेल्या मालक गुरुदास सदाशिव कुर्टीकर (वय 52) यांनी दुकानाकडे धाव घेतली. त्यावेळी चोरट्यांनी दुकानातील फ्रीजमधील काचेच्या बाटल्या फेकून गुरुदासला जबर जखमी केले. त्याही स्थितीत गुरुदासने एका चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न केला, पण तो निसटला. गुरुदासने आरडाओरड केल्यामुळे या चोरट्यांनी सोबत आणलेल्या दोन्ही दुचाक्या तेथेच सोडून पळ काढला.

दोन एटीएम नेले; एक फोडू शकले
तिस्क – उसगाव येथे एचडीएफसी बँक व कॅनरा बँकेची दोन्ही एटीएम मशिन्स मध्यरात्री चोरट्यांनी पळवली. ही दोन्ही मशिन्स जवळच एक किलोमीटरवर कुळण भागात निर्मनुष्य ठिकाणी फोडण्याचा प्रयत्न केला. त्यात एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडले आहे. या एटीएममधील 13 लाख 37 हजार वीस रुपये चोरट्यांनी पळवले. मात्र, कॅनरा बँकेचे एटीएम मजबूत असल्याने फोडणे त्यांना शक्य झाले नाही. चोरट्यांनी लोखंडी पहारीने हे मशिन फोडण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. पण काही उपयोग झाला नाही. परिणामी कॅनरा बँकेचे पैसे वाचले. चोरट्यांनी या चोरीसाठी वापरलेली व्हॅन (जीए 09 ए 0324) पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. चोरट्यांनी ती उसगाव येथून पळवल्याचे पोलिसांनी सांगितले.

युवतीला खाली पाडले
कुर्टी येथे दुचाकीवरून जाणार्‍या एका युवतीला दुचाकीवरून आलेल्या दोघांनी खाली पाडले. त्यावेळी दुचाकीच्या मागे बसलेल्या चोरट्याने युवतीची सुमारे दीड लाखाची सोन्याची साखळी खेचली व पळ काढला. हा प्रकार गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास घडला. युवतीही जखमी आहे.

Back to top button