गोवा : पणजीत बनावट दागिन्यांद्वारे घातला बारा लाखांना गंडा | पुढारी

गोवा : पणजीत बनावट दागिन्यांद्वारे घातला बारा लाखांना गंडा

पणजी; पुढारी वृत्तसेवा :  बनावट जुने दागिने देऊन पणजीतील एका सुवर्णकाराला 12 लाखांचा गंडा घालणार्‍या तिघा सराईत भामट्यांच्या टोळीचा पोलिसांनी मुसक्या आवळल्या. याप्रकरणी गुजरात येथील दोघा युवकांना अटक करण्यात आली असून, त्यांची सहकारी असलेल्या एका महिलेला ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली आहे.
पणजी येथील टीएनएस ज्वेलर्समध्ये वरील संशयितांनी जुन्या; परंतु बनावट दागिन्यांच्या बदल्यात 12 लाखांचे सोन्याचे दागिने खरेदी करून फसवणूक केली.

पणजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे तिघे संशयित 14 रोजी सकाळी 11 वाजता टीएनएस ज्वेलर्स मध्ये आले. त्यांनी आपल्याकडील जुने दागिने दुकानदाराला दिले. ते दागिने जुने व सोन्याचा मुलामा दिलेले होते. वजनानुसार दागिन्यांची किंमत सुमारे 30 लाखांहून अधिक होती. त्यांनी त्या बदल्यात 12 लाखाचे दागिने देण्यास सांगितले व ते दागिने घेऊन तिघेही पसार झाले. ते गेल्यानंतर दागिने वितळविले असता ते बनावट असल्याचे व फसवणूक झाल्याचे उघड झाले.

या ज्वेलर्स शोरूममध्ये बनावट व अधिकृत सोन्याची पडताळणी करण्यासाठी यंत्र असूनही या यंत्रालाही बनावट दागिने ओळखता आले नाहीत. त्यानंतर शोरूम चालकाने पोलिसांत तक्रार केली असता पोलिसांनी शोरूममधील सीसीटीव्ही कॅमेर्‍यातील फुटेजच्या सहाय्याने या प्रकरणाचा तपास सुरू केला. रस्त्यावरील काही आस्थापनांच्या सीसीटीव्ही फुटेजची मदत घेतली. संशयितांचा सुगावा लागताच त्यांना एका हॉटेलमधून पळून जाण्याच्या तयारीत असताना 15 रोजी ताब्यात घेतले.

संशयित पोरबंदर-गुजरात येथील असून त्यांच्याकडून सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. अटक केलेले संशयित केशुभाई अभाभाई परमार (32 वर्षे) आणि मुकेशभाई समतभाई परमार (26 वर्षे) यांना न्यायदंडाधिकांर्‍यासमोर उभे केले असता त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यांची साथीदार असलेल्या महिलेला ताब्यात घेऊन तिची चौकशी सुरू असल्याची माहिती तपास अधिकारी उपनिरीक्षक संकेत पोखरे यांनी दिली.

जास्त लोभापाई झाली फसवणूक
वजनानुसार दागिन्यांची किंमत सुमारे 30 लाखांहून अधिक होती. संशयितांनी आपल्याकडचे 30 लाखांचे दागिने घ्या व त्याच्या बदल्यात 12 लाखांचे दागिने देण्याची विनंती शोरूम चालकाला केली. 30 लाखांचे दागिने 12 लाखांत मिळतात या आशेने शोरूम चालकाने त्यांना 12 लाखांचे दागिने दिले. तेे दागिने घेऊन दोन युवक व एक महिला लगेच निघून गेल्यानंतर शोरूमद्वारे दागिने वितळवले असता ते बनावट असल्याचे उघड झाले.

Back to top button