मडगाव : सासष्टी तालुक्यात दिग्गजांचा पराभव | पुढारी

मडगाव : सासष्टी तालुक्यात दिग्गजांचा पराभव

मडगाव ः पुढारी वृत्तसेवा पंचायत निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी भाजपने अनेक ठिकाणी आपले वर्चस्व प्रस्थापित केले. मात्र दक्षिण गोव्यात सासष्टी तालुक्यात काँग्रेसचे उमेदवार निवडून आल्याने सासष्टीत भाजपला अपेक्षित यश संपादित करता आले नाही. कोणकोण तालुक्यातील 7 पंचायतीत अनेक दिग्गजांचा पराभव झाला. या ठिकाणी जनतेने नवीन चेहर्‍यांना संधी दिली. तर ना ना म्हणता म्हणता यंदा गोवा फॉरवर्डने दक्षिणेच्या पंचायतीत खाते उघडले आहे.

सासष्टीत 33 पैकी चांदर, गिरदोली आणि माकाजन या तीन पंचायतींवर काँग्रेसचे कार्याध्यक्ष व कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांचे पॅनल निवडून आले. तर वेळ्ळी पंचायतीवर काँग्रेसचे दक्षिण गोवा अध्यक्ष सावियो डिसिल्वा यांचे केवळ चार उमेदवारच निवडून आले आहे. बेताळभाटी पंचायतीत मिकी पाशेको यांच्या पत्नी व्हीयोला पाशेको या पहिल्यांदाच निवडणुकीत जिंकल्या असून नुवे पंचायतीतून माजी आमदार बाबाशन यांच्या पत्नी फ्रेडा डीसा यांनी विजयाचा चौकार मारला आहे.

केपे मतदारसंघात निवडणुकीची झालेली लढत ही आमदार एल्टन डिकोस्ता व माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर यांच्यात होती. आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी एल्टन यांनी बरीच खटाटोप केली होती. मात्र बाबू कवळेकर यांनी सात पंचायतींवर विजय प्राप्त केल्याने बाबूंचा पगडा केपेत पुन्हा भारी झाला आहे. एल्टन यांना शेवटी दोनच पंचायती नशिबी आल्याने त्यावरच समाधान मानावे लागले आहे. नावेली मतदारसंघातील पंचायत निवडणुकीचा निकाल पाहिल्यास भाजपचे पक्के गणित यंदा चुकल्याचे समोर आले आहे.
नावेलीत पहिल्यांदाच भाजपला आमदार निवडून आणणे शक्य झाले होते. उल्हास तुयेकर यांची एकनिष्ठ कामगिरी पाहून जनतेने त्यांना निवडून दिले होते.

मात्र तुयेकर यांचा नावेलीत प्रभाव पडला नसल्याने रूमडामळ – दवर्ली, या पंचायतीत उभ्या केलेल्या उमेदवारांना फारकत मतांनी पराभव स्वीकारावा लागला. 9 उमेदवारांपैकी या पंचायतीत फक्त दोघेच निवडून आले आहेत. भाजपचे प्रवक्ते उर्फान मुल्ला यांचा नावेलीत पराभव झाला आहे. मुल्ला यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार ओम्रान पठाण यांच्यापेक्षा 32 मतांच्या फरकाने भाजपला धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला आहे. पठाण यांना 173 तर मुल्ला यांना 141 मते मिळाली आहे. मुल्ला यांनी आपल्या पराभवाचे स्पष्टीकरण देताना, निवडणुकीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे वगळल्यास अन्य कुणीही सहकार्य न केल्याचे त्यांनी सांगितले.

बाणावलीत मिश्र स्वरूपाचा निकाल जाहीर झाला आहे. बाणावली पंचायतीत काही उमेदवार चर्चिल आलेमाव तर काही उमेदवार व्हेंजी व्हिएगस गटातील होते. वर्का पंचायतीच्या प्रभाग 2 मधून चर्चिल आलेमाव यांची कन्या शेरॉन डीकोस्ता या निवडून आल्या आहेत. ओर्ली पंचायतीत सीमा शंके यांना चौथ्यांदा विजय प्राप्त झाला. राशॉल पंचायतीतून माजी सरपंच जोजेफ वाज यांनी विजयाचा षटकार ठोकला आहे. बाणावली पंचायतीत यंदा फॅमली राज बहुमतांनी आले आहे. दोन दाम्पत्य, एक नणंद व भावजय मिळून तीन कुटुंबातील सहा सदस्य निवडून आलेले आहे. दरम्यान या फॅमिली राज मध्ये सहभागी झालेले एकमेव दाम्पत्य पराभूत झाले आहे. या निवडणुकीत खोतिगावचे माजी सरपंच दया गावकर, राजेश गावकर, खोलाचे माजी सरपंच श्रीनिवास नाईक आणि पूर्णा नाईक, श्रीस्थळ पंचायतीचे माजी सरपंच देवेंद्र नाईक, आगोंदचे माजी सरपंच बादल गावकर आणि माजी सरपंच प्रतिमा फळदेसाई, यांना मतदारांनी नाकारले.
पैंगीण पंचायतीमध्ये दया पागी आणि दीक्षा पागी या पतीपत्नीचा पराभव झाला आहे. तर लोलयेचे माजी सरपंच अजय लोलयेकर, सचिन नाईक, गाव डोंगरीचे अशोक वेळीप, श्रीस्थळचे माजी सरपंच गणेश गावकर, रामू नाईक, पैंगीणचे महेश नाईक, माजी उपसरपंच सतीश पैंगीणकर, प्रवीण भंडारी हे यंदा जिंकून आले आहे.

लोलये पंचायतीमधून निवडणूक लढवणार्‍या भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा विंदा सतरकर आणि काँग्रेसच्या महिला विभागाच्या अध्यक्षा उर्सीला डिकोस्ता यांचा पराभव झाला आहे. एकंदरीत सासष्टीतील आणि कोणकोण पंचायतींचा आढावा घेतल्यास केपेत शेल्डे व असोल्डा पंचायतीत मंत्री नीलेश काब्राल, कोणकोण तालुक्यावर सभापती रमेश तवडकर, सांगेत मंत्री सुभाष फळदेसाई यांना आपला गड राखून ठेवण्यास यश आले आहे.

सविता तवडकर यांचा सरपंच पदावर दावा

कोणकोणमध्ये सर्वांच्या नजरा टिकून राहिलेल्या पैंगीण पंचायतीच्या आमोणे प्रभागातून सभापती रमेश तवडकर यांच्या पत्नी सविता तवडकर यांनी आपले प्रतिस्पर्धी असलेल्या आनंदू दैकर यांच्यावर 204 मतांची आघाडी मिळवून विजय संपादन केला. 615 मतदारांपैकी 388 मतदारांनी त्यांना जिंकवून आणले आहे. हा प्रभाग खुला असतानाही सविता तवडकर निवडणुकीत उतरल्या होत्या. आता यापुढे पैंगीण पंचायतीचे सरपंचपद महिलांसाठी राखीव असल्यामुळे सरपंचपदावर आपला दावा करणार आहे.

Back to top button