गोवा : आगशी, जुने गोवे येथे विधानसभेची पुनरावृत्ती | पुढारी

गोवा : आगशी, जुने गोवे येथे विधानसभेची पुनरावृत्ती

पणजी; पुढारी वृत्तसेवा :  तिसवाडी तालुक्यातील कुंभारजुवे व सांत आंद्रे विधानसभा मतदारसंघात विधानसभेला जसा निकाल लागला तसाच अनपेक्षित निकाल पंचायत निवडणुकीत लागला. सांतआंद्रेचे माजी आमदार फ्रान्सिस सिल्वेरा यांचा आरजी उमेदवार विरेश बोरकर यांनी अवघ्या 76 मतांनी पराभव केला होता. आता आगशी पंचायतीत सिल्वेरा यांचे कट्टर समर्थक आगशीचे अनेक वर्षे सरपंच असलेले झेवीयर फ्रान्सिस्को ग्रासीयस यांचा आरजी समर्थक उमेदवार लक्षदीप गावस यांनी अवघ्या पाच मतांनी पराभव केला.

ग्रासीयस हे गेली 35 वर्षे पंचायतीत निवडून येत होते. तर लक्षदीप गावस हे अवघ्या 22 वर्षांचे आहेत. त्यांना प्रभाग 10 मधून 207 मते मिळाली तर ग्रासीयस यांना 202 मते मिळाली. त्यामुळे एका युवकाने त्याच्या वयाच्या जास्त वर्षे पंच राहिलेल्या ज्येष्ठ पंचाचा पराभव केला. मात्र आगशी पंचायतीवर सिल्वेरा गटालाच बहुमत मिळाले आहे.

12 हजारांची आघाडी घेणार्‍याच्या मुलीला 61 मते
कुंभारजुवेचे माजी आमदार व माजी मंत्री पांडुरंग मडकईकर हे अनेक वर्षे विविध पक्षाच्या उमेदवारीवर तेथून निवडून येत होते. तब्बल 12 हजाराची आघाडी घेऊनही ते निवडून आले होते. मात्र ते आजारी असल्याने विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पत्नी जेनीता मडकईकर यांना भाजपने उमेदवारी दिली. मात्र त्यांना अवघी 3949 मते मिळाली, तर विजयी उमेदवार राजेश फळदेसाई यांना 6776 मते मिळाली. तोच कित्ता पंचायतीत गिरवला गेला.
मडकईकर यांची राजकीय वारस त्यांची मुलगी सुहिरा मडकईकर या प्रभागात जुने गोवे पंचायतीच्या प्रभाग 4 मधून उभ्या होत्या. त्यांना अवघी 61 मते मिळाली. तेथे 131 मते घेऊन सांड्रा गोन्साल्वीस विजयी झाल्या. त्यामुळे 12 हजारांची आघाडी घेणार्‍या वडिलांच्या मुलीला इतकी कमी मते पडल्याने तो एक चर्चेचा विषय झाला आहे.

काँग्रेसचे गट अध्यक्ष पराभूत
कुंभारजुवा मतदारसंघाचे काँग्रेसचे गट अध्यक्ष व मावळते पंच विशाल वळवईकर हे जुने गोवे पंचायतीच्या प्रभाग 6 मधून पराभूत झाले. त्यांना 97 मते मिळाली तर विजेते उमेदवार विनायक फडते यांना 147 मते मिळाली.

तिसवाडीतील अटीतटीच्या लढती
कुडका बांबोळी पंचायत – प्रभाग 2 : मारिया डिकुन्हा 277 विरुद्ध आनंद वेर्लेकर 277 (समान मते झाल्याने नाणेफेकीत डिकुन्हा विजयी).
कुडका बांबोळी पंचायत – प्रभाग 6 : माया शिरगावे 69 वि. प्रशिला गावस 68 (एका मताने शिरगावे विजयी)
गोवा वेल्हा पंचायत – प्रभाग 6 : मोनिका मिरांडा 67 वि. रोहिदास गावस 66 (एका मताने मिरांडा विजयी)
शिरदोन पाळे पंचायत – प्रभाग 5 : तेजा कुंकळ्ळीकर 92 वि. सुजाता काणकोणकर 90 (कुंकळ्ळीकर 2)

खोर्लीत केरकर दाम्पत्य काठावर पास
खोर्ली पंचायतीत आम आदमी पक्षाचे नेते असलेेले गोरखनाथ केरकर व त्यांच्या पत्नी सुप्रिया केरकर या काठावर पास झाल्या. गोरखनाथ यांना प्रभाग 9 मधून 237 मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी राजीव धुळापकर यांना 211 मते मिळाली. सुप्रिया केरकर या तर दोन मतांनी निवडून आल्या. त्यांना प्रभाग 5 मधून 118 मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी रिचर्ड परेरा यांना 116 मते मिळाली.

Back to top button