गोवा : कालेत पती पराभूत, पत्नी विजयी | पुढारी

गोवा : कालेत पती पराभूत, पत्नी विजयी

मडगाव; पुढारी वृत्तसेवा :  काले पंचायतीची निवडणूक प्रस्थापितांसाठी धक्कादायक निकाल देणारी ठरली आहे. सावर्डे भाजप मंडळाचे अध्यक्ष विलास देसाई यांचे बंधू आणि दोन वेळचे पंच सदस्य किशोर गावस देसाई अवघे 75 मते घेऊन पराभूत झाले, तर त्यांच्या पत्नी किमया देसाई या प्रभाग सहामधून विजयी ठरल्या आहेत.

किमया यांना प्रभाग सहामधून त्यांचे पती किशोर यांनी उतरवले होते आणि ते स्वत: प्रभाग चारमधून रिंगणात उभे राहिले होते. भाजपमध्ये झालेली फुटाफूट आणि जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात झालेले मतदान यंदा प्रस्थापितांना घरी बसवण्यात कारणीभूत ठरले आहे.स्वत: किशोर यांनी प्रभाग चारमधून बराच जोर लावला होता. मात्र त्यांचा करिष्मा कमी पडला. नरेंद्र गावकर यांनी त्यांना धोबीपछाड करत सहज मजल मारली.

किशोर देसाई यांचा पराभव भाजपासाठी धक्कादायक ठरला असला तरीही दुसरा गट भाजपाचाच असल्याने या पंचायतीवर भाजपाचे राज्य असेल हे स्पष्ट होत आहे. काले पंचायतीवर प्रभाग एक मधून गंगाराम गावकर यांची बिनविरोध निवड झाली होती. प्रभाग दोनमधून शैलेश नाईक (129),प्रभाग तीनमधून बाळू रेकडो( 110),प्रभाग चारमधून नरेन्द्र गावकर(242), प्रभाग पाचमधून सांगवी नाईक (331),प्रभाग सहा मधून किमया देसाई (154),प्रभाग सात मधून दिप्ती शिंगाडी (301) निवडून आले आहेत.

Back to top button