गोवा पंचायत निवडणूक निकाल : भाजप सुसाट, विरोधक भुईसपाट | पुढारी

गोवा पंचायत निवडणूक निकाल : भाजप सुसाट, विरोधक भुईसपाट

पणजी : पुढारी वृत्तसेवा राज्यातील 186 पंचायतींसाठी झालेली निवडणूक पक्षीय स्तरावर नसली तरी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी सर्वाधिक ठिकाणी विजय मिळवला. विरोधक बहुतेक ठिकाणी भुईसपाट झाले. अनेक पंचायतींसाठी भाजपच्याच दोन-तीन गटांमध्ये लढती झालेल्या होत्या. जिंकेल तो आपला, असे भाजपचे धोरण होते. विजयी उमेदवारांत दुसर्‍या क्रमांकावर अपक्ष उमेदवार आहेत. भाजपच्या मंत्र्यानी आपले गड राखले. अनेक ठिकाणी अनपेक्षित निकाल लागले. काही जागी एका दोन मतानेही उमेदवार निवडून आले.

विरोधी पक्ष काँग्रेस, आम आदमी पक्ष, गोवा फॉरवर्ड पक्ष, रिव्हॉल्युशनरी गोवन्स या राजकीय पक्षाचे बळ या निवडणुकीत फिके पडले. वीज मंत्री व मगोचे प्रमुख नेते सुदिन ढवळीकर यांच्या मडकई पंचायतीत मगो पॅनल बहुमतापासून दूर राहिले. कळंगुट पंचायतीत विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांच्या पॅनेलचे फक्त तीन उमेदवार निवडून आले. कळंगुट पंचायतीत लोबो यांचे विरोधक व भाजपचे विधानसभा उमेदवार जोसेफ सिक्वेरा यांनी सात उमेदवार जिंकून आणले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व नगर नियोजन मंत्री विश्वजित राणे यांच्या साखळी व वाळपई मतदारसंघात बहुतांश सर्वच पंचायतीवर त्यांच्या समर्थकांना बुहमत प्राप्त झाले. विरोधी पक्षाचे कुकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांनी काही प्रमाणात जोर दाखवला तर आरजीचे एकमेव आमदार विरेश बोरकर यांच्या मतदारसंघातील एकमेव आजोशी मंडूर पंचायतीत आरजीचे तीन उमेदवार जिंकले असून एका अपक्षाला सोबत घेऊन तेथे सत्ता प्रास्थापित करण्याचा प्रयत्न आमदार बोरकर यांनी सुरू केला आहे.

राज्यातील 186 पंचायतीच्या 1464 प्रभागांसाठी 5038 उमेदवार उभे होते. 64 प्रभागातील उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले होते. शुक्रवारी राज्यात 21 जागी मतमोजणीला सुरुवात झाली. बार्देश व सासष्टी या दोन तालुक्यात सर्वात जास्त प्रत्येकी 33 पंचायती आहेत. तेथे दोन दोन जागी मतमोजणीसाठी सोय करण्यात आली होती. मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्यात आल्याने मोजणीसाठी काही प्रमाणात जास्त वेळ लागत होता. विजयी उमेदवारांचे समर्थक घोषणा देत मतमोजणी केद्रांपासून आपल्या गावी जात होते. काही ठिकाणी स्थानिक आमदार आपल्या समर्थक उमेदवारांसोबत आनंदोत्सव साजरा करत होते.

निवडून आले ते आपले

सत्तरी सारख्या जागी एकाच नेत्याचे दोन दोन समर्थक आमने सामने ठाकले होते. निवडून आलेल्यांनी थेट मंत्री विश्वजित राणे यांची भेट घेण्याचे सत्र सुरू केले होते. त्यामुळे राणे यांनीही ‘निवडून आले ते आपले’ म्हणत आपले प्राबल्य दाखवणे सुरू केले. अनेक नेते मतदान केंद्राबाहेर थांबून आपल्या पॅनेलच्या उमेदवारांचे अभिनंदन करत होते.

अपक्षांची चांदी… सरपंच पदाची लॉटरी

राज्यातील बहुतांश पंचायती या 7 किंवा 9 प्रभागाच्या आहेत. तेथे विरुद्ध विचारांच्या पक्षाचे समान उमेदवार निवडून आले आहेत. अशा पंचायतीत अपक्ष निवडून आलेल्या एका उमेदवाराचे भाग्य त्यामुळे फळफळणार आहे. त्याला सरपंच पदाची लॉटरी लागणार आहे.

होंडाचे मावळते सरपंच दोन मताने हरले

सत्तरी तालुक्यातील होंडा पंचायतीचे मावळते सरपंच आत्मा गावकर हे अवघ्या दोन मतांनी पराभूत झाले. प्रभाग 4 मध्ये त्यांना 203 मते तर विजयी उमेदवार दीपक गावकर यांना 205 मते मिळाली. होंडा पंचायतीच्या प्रभाग 5 मध्ये तर बाबाजी ठाकूर हे एका मताने पराभूत झाले. ठाकूर यांना 133 मते मिळाली तर विजयी उमेदवार सुशांत राणे यांना 134 मते मिळाली आहेत.

दिग्गज पराभूत, नवोदित विजयी

राज्यातील अनेक पंचायतीत सातत्याने निवडून येणारे काही दिग्गज पराभूत झाले. तर काहीजन चौथ्यांदा ,पाचव्यांदा विजयी झाले. अनेक युवा चेहरे यावेळी निवडून आले आहेत. निवडून आलेल्यात महिलांची संख्या बरीच मोठी आहे.

हेही वाचा

Back to top button