गोवा : नारी शक्‍ती निर्णायक; आज ठरणार टक्‍का | पुढारी

गोवा : नारी शक्‍ती निर्णायक; आज ठरणार टक्‍का

पणजी; पुढारी वृत्तसेवा :  राज्यातील 186 पंचायतींच्या 1,528 प्रभागांसाठी आज, 10 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. 5 हजार 38 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होईल. आज, बुधवार सायंकाळपर्यंत मतदानाचा टक्‍का समजेल.

या निवडणुकीत पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या जास्त आहे. महत्त्वाचे म्हणजे मतदानाची टक्केवारीही पुरुषांपेक्षा महिलांची जास्त होते. त्यामुळे राज्यातील पंचायतींचे भवितव्य महिलांच्या हाती आहे. राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी संध्याकाळी कडक सुरक्षेत मतदान पेट्या राज्यभरातील मतदान केंद्रांत पोहोचवल्या. मतदान प्रक्रियेसाठी चार हजार पोलिस व 10 हजार 700 कर्मचारी नेमण्यात आले आहेत.

उमेदवारांकडून आमिषे
जाहीर प्रचार संपला असला तरी मंगळवारी उमेदवारांनी तसेच त्यांच्या नेत्यांनी मतदारांना विविध आमिषे दाखवण्याचा प्रयत्न केला. मतदारांना पैसे वाटणे, नोकरीचे आश्‍वासन देणे, घराच्या बांधकामाची समस्या सोडवणे आदी विविध आमिषे दाखवण्यात आली. गावापासून दूर राहणार्‍या मतदारांना आणण्यासाठी खास वाहनांची सोय करण्यात आली आहे. बुधवारी मतदान होणार असल्याने मंगळवारची रात्र महत्त्वाची ठरली आहे. काही उमेदवारांच्या समर्थकांनी आपापल्या वाड्यावर दुसर्‍या उमेदवाराचे समर्थक येऊ नयेत म्हणून रात्रभर जागरण करण्याचे ठरवले आहे. काही उमेदवाराच्या काळजात आत्तापासूनच धडधड सुरू झालेली असून मतांसाठी पैशांचे वाटप होत असल्याने ज्यांनी पैेसे वाटले नाहीत त्यांच्या मनात आपले काय होणार याची चिंता आहे. तर ज्यांनी पैसे वाटलेत त्यांना पैसे घेतलेल्यांची मते आपल्यालाच मिळतील का हा प्रश्‍न सतावत राहणार आहे.

संबंधित बातम्या

चार हजारांवर पोलिसांचा फौजफाटा
निवडणुकीसाठी चार हजार पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असेल. गोवा पोलिसांसोबत एटीएस, बॉम्बविरोधी पथकही सज्ज आहेत. संवेदनशील 45 मतदान केंद्रांवर जास्त बंदोबस्त असेल. उत्तर गोव्यात भारतीय राखीव दलाचे 12 उपनिरीक्षक, 26 सहायक पोलिस उपनिरीक्षक, 95 हवालदार आणि 229 पोलिस कॉन्स्टेबल असे एकूण 362 कर्मचार्‍यांचा समावेश आहे. दक्षिण गोव्यात 15 सहायक पोलिस उपनिरीक्षक, 212 हवालदार, 738 कॉन्स्टेबल आणि 260 गृहरक्षक मिळून 1225 कर्मचार्‍यांची तैनाती आहे. याशिवाय दहशतवाद विरोधी पथक, बॉम्ब निकामी पथक, जलद कृती दल, विशेष विभाग पोलिस व राखीव पोलिस कर्मचार्‍यांसह सुरक्षा यंत्रणेसाठी सुमारे 800 कर्मचारी तैनात आहेत.

मतमोजणी केंद्रे
उत्तर गोवा

  •  तिसवाडी : 18 पंचायती. बांबोळी येथील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियम
  •  सत्तरी : 12 पंचायती. वाळपई येथील कदंब बसस्थानक सभागृह.
  •  बार्देश : 33 पंचायती. पेडे येथील क्रीडा संकुलात बॉक्सिंग हॉल, बॅडमिंटन हॉल आणि दयानंद बांदोडकर क्रीडा संकुल.
  •  पेडणे : 17 पंचायती.
  • विर्नोडा येथील संत सोहिरोबानाथ महाविद्यालय व तुये येथील दीनदयाळ भवन.
  •  डिचोली : 17 पंचायती. वाठादेव सर्वण येथील झांट्ये महाविद्यालयाचे बहुउद्देशीय सभागृह.

दक्षिण गोवा

  •  सासष्टी : 33 ग्रामपंचायती. नावेली येथील मनोहर पर्रीकर इनडोअर स्टेडियम, मडगाव येथील माथानी साल्ढाना प्रशासकीय इमारत.
  •   फोंडा : 19 पंचायती. फर्मागुडी येथील आयटीआय संस्था.
  •  सांगे : 7 पंचायती. सांगे येथील सरकारी क्रीडा संकुल.
  •  मुरगाव : 7 पंचायती. वास्कोतील रवींद्र भवन मिनी थिएटर.
  •   धारबांदोडा : 5 पंचायती. धारबांदोडा येथील सरकारी कार्यालय संकुल.
  •   केपे : 11 पंचायती. बोरीमळ केपे येथील सरकारी क्रीडा संकुल.
  •   काणकोण : 7 पंचायती. मामलेदार कार्यालयातील परिषदगृह.
  •   एकूण पंचायती : 186
  •  मतदान : बुधवार 10 ऑगस्ट
  •  वेळ : सकाळी 8 ते सायं. 5
  •  निकाल : शुक्रवार, 12 ऑगस्ट
  •  एकूण प्रभाग : 1 हजार 464
  •  मतदान केंद्रे : 1 हजार 517
  •  संवेदनशील मतदान केंद्रे :45
  •  उमेदवार : 5 हजार 38
  •  बिनविरोध उमेदवार : 64

बार्देशात सर्वाधिक 15 केंद्रे संवेदनशील
राज्यात 45 मतदान केंद्रे संवेदऩशील आहेत. यात उत्तर गोव्यातील 27 व दक्षिण गोव्यातील 18 मतदान केंद्रांचा समावेश आहे. सर्वात जास्त बार्देश तालुक्यात 15 आहेत. असुरक्षित, गंभीर व संवेदनशील अशा तीन विभागात या 45 मतदान केंद्रांचे वर्गीकरण करण्यात आले आहे.

Back to top button