गोवा : सत्तरीतील धबधब्यांचा होणार विकास | पुढारी

गोवा : सत्तरीतील धबधब्यांचा होणार विकास

वाळपई; पुढारी वृत्तसेवा : सत्तरी तालुक्यातील पावसाळी धबधब्यांवर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होते. मात्र, या ठिकाणी अनेक प्रकारच्या गैरसोयी संदर्भात वनखात्याने विशेष लक्ष दिलेले आहे. येणार्‍या काळात या धबधब्यांवर अनेक प्रकारच्या सुविधा निर्माण होणार आहेत. या संदर्भाची कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे. वनमंत्री विश्‍वजित राणे यांनी यासंदर्भात खात्याला सूचना केल्या आहेत.

या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून कागदोपत्री सोपस्कार पूर्ण करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे येणार्‍या काळात अनेक प्रकारच्या सुविधा धबधब्यावर निर्माण होणार असून पर्यटकांना यामुळे अनेक स्तरावर फायदा होणार आहे.

सत्तरी तालुक्यात पावसाळी हंगामात मोठ्या प्रमाणात डोंगरावरून धबधबे कोसळत असतात. निसर्गाचा सुंदर आविष्कार अनुभवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक सत्तरी तालुक्यातील अनेक धबधब्यांवर भेटी देतात. मात्र, हल्लीच्या काळात मोठ्या प्रमाणात दुर्घटना घडू लागलेल्या आहेत. जवळपास एक महिन्यापूर्वी साट्रे येथील एका धबधब्यावर दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला होता. यामुळे धबधब्यावर सुरक्षितता व सुविधांबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते.

या संदर्भाची गंभीर दखल घेऊन वनखात्याने एक विशेष मोहीम आखलेली आहे. या मोहिमेंतर्गत धबधब्यांचा विकास करण्यात येणार आहे. या संदर्भात वनमंत्र्यांनी एक विशिष्ट आदेश जारी केला असून, या आदेशांतर्गत वनखात्याने त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिलेले आहेत. यानुसार धबधब्याच्या ठिकाणी दोन जीव रक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ज्या धबधब्यावर पर्यटकांकडून हुल्लडबाजी करण्यात येत आहे त्यांना रोखण्यासाठी विशेष मोहीम आखण्यात आलेली आहे, अशी माहिती उपलब्ध झालेली आहे.

सत्तरी तालुक्यात एकूण दहापेक्षा जास्त धबधबे आहेत. या धबधब्यांवर पावसाळी मौसमात मोठ्या प्रमाणात पर्यटक भेटी देत असतात. त्यामुळे येथे सुविधा निर्माण करणार आहेत.

 
100 रुपये शुल्क
वनखात्यातर्फे ही व्यवस्था करण्यात येणार आहे. मात्र, येणार्‍या प्रत्येक पर्यटकाकडून प्रत्येकी 100 रुपयाचे शुल्क आकारण्यात येणार असून, त्यासाठी पर्यटकांनी सहकार्य करावे, असे आवाहन खात्यातर्फे करण्यात आलेले आहे.
यासाठी अभयारण्याचे उपवनपालना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले असून, या संदर्भाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने होणार असल्याचे एकूण मिळालेल्या माहितीनुसार समजते.

शौचालये, चेंजिंग रुम्सची करणार सोय
प्रत्येक धबधब्यावर येणार्‍या पर्यटकांना शौचालयाची मोठी समस्या निर्माण होत असते. यामुळे पर्यटक उघड्यावर नैसर्गिक विधी करीत असतात. त्यामुळे पर्यावरणावर मोठ्या प्रमाणात आघात होत असतो. याची विशेष दखल घेऊन प्रत्येक धबधब्याच्या ठिकाणी बायोटोयलेटची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पर्यटकांना कपडे बदलण्यासाठी चेंजिंग रुम्सची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे एकूण मिळालेल्या माहितीनुसार समजते.

पर्यटनाला मिळणार चालना : दिव्या राणे
या संदर्भात वनविकास महामंडळाच्या चेअरमन डॉ. दिव्या राणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, यासंदर्भाच्या सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टिकोनातून वनमंत्री विश्‍वजित राणे यांनी विशेष निर्देश जारी केलेले आहेत. त्याची अंमलबजाणी करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यात येणार असून, यासंदर्भात वनखात्याने आपली कार्यवाही सुरू केल्याचे दिव्या राणे यांनी स्पष्ट केले. सत्तरी तालुक्यातील धबधब्यांच्या माध्यमातून पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून या संदर्भात हालचाली सुरू करण्यात आल्या असून, यासाठी नागरिकांनी व पर्यटकांनी सहकार्य करावे, असे आवाहन दिव्या राणे यांनी केले आहे.

Back to top button