गोवा : हौसच बनली त्याच्या उत्पन्नाचे साधन | पुढारी

गोवा : हौसच बनली त्याच्या उत्पन्नाचे साधन

मडगाव; रतिका नाईक :  कोरोना काळात अनेकांच्या नोकर्‍या गेल्या, या काळात परदेशातून गोव्यात परतलेल्या अनेक खलाशांनाही परत जाता आले नाही. अशाच परतलेल्या करमणे येथील एका खलाशी बांधवाने ऑइन्स्टर अळंबीचे उत्पादन घेऊन तरुणांसमोर आदर्श निर्माण केला आहे. सेनफोर्ड डिक्रुज असे या खलाशाचे नाव असून सुरुवातीला हौस म्हणून सेनफोर्ड याने अळंबीचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली होती. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन जूनपासून त्याने व्यावसायिकरीत्या अळंबीचे उत्पादन व विक्री करण्यास सुरुवात केली आहे. ही अळंबी मांसासाठी पर्याय म्हणून सुद्धा खाता येतात, असे त्यांनी सांगितले.

सेनफोर्ड गेल्या 10 ते 12 वर्षांपासून परदेशात नोकरीसाठी जात होता. कोरोनाच्या काळात त्यांना परत जाता आले नाही. यावेळी त्यांनी छंद म्हणून ऑइन्स्टर अळंबीचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली होती. अळंबीची वाढती मागणी आणि महत्त्व जाणून त्यांनी आता व्यावसायिकरित्या अळंबीची विक्री करण्यास सुरुवात केली आहे. ही अळंबी आरोग्यासाठी हितकारक असून पौष्टिक अन्न म्हणून या अळंबीचा समावेश जेवणामध्ये करता येतो, असे त्यांनी सांगितले.

कोरोना काळात केपेच्या डॉन बॉस्को महाविद्यालयाने ग्रामीण भागातील लोकांसाठी अळंबी उत्पादन घेण्यासाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. या शिबिरातून सेनफोर्ड ना उत्पादन घेण्यासाठी प्रेरणा मिळाली. अळंबी पिकविणार्‍या मित्रानेही उत्पादन घेण्यास सेनफोर्ड याला मदत केली व माहिती दिली. यानंतर प्रायोगिक तत्त्वावर सेनफोर्ड याने अळंबीचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली होती. यासाठी खूप कमी खर्च लागतो, असे त्यांनी सांगितले. सुरुवातीला शेतातील वाळलेले गवत बर्‍यापैकी गरम पाण्यात उकळून घ्यायचे आणि थंड झाल्यावर ते बांधून त्यात अळंबीची बीजे घालून टांगायचे. या अळंबीसाठी जास्तीत जास्त थंड वातावरणाची आवश्यकता असल्याने दरदिवशी या बांधून ठेवलेल्या गवतावर पाणी शिंपडावे लागते, असे त्यांनी सांगितले.

अळंबीसाठी ग्राहकांची मोठी मागणी
अळंबी आरोग्यासाठी चांगली असून खाण्यासाठीही चविष्ट लागतात. यामुळे दिवसेंदिवस या अळंबीची मागणी वाढत असून करमणे तसेच कुडतरी, मडगाव इत्यादी भागातूनही अळंबी खरेदीसाठी ग्राहक येतात, असे त्यांनी सांगितले. दारोदारी जाऊनही अळंबीची विक्री करतो, असेही त्यांनी सांगितले. एक किलो अंळबीसाठी 150 रु. खर्च येतो. तर 600 रुपयाला त्याची विक्री होते. कुठलेही काम कमी दर्जाचे नसते, काम करण्यास लाजू नये, असे त्यांनी सांगितले. मेहनतीने कमविलेला एक रुपयाही लाख मोलाचा असतो. मेहनत व चिकाटी एखाद्याला सर्व क्षेत्रात यश मिळविण्यास मदत करते, असा संदेश त्यांनी दिला आहे.

Back to top button