गोवा : बार्देशमध्ये मंत्री, आमदारांची प्रतिष्ठा पणाला | पुढारी

गोवा : बार्देशमध्ये मंत्री, आमदारांची प्रतिष्ठा पणाला

म्हापसा;  नारायण राठवड :  बार्देश तालुक्यात सात विधानसभा मतदारसंघ असले तरी त्यातील म्हापसा मतदार संघ पालिका क्षेत्रात येतो. यातील दोन प्रभाग हळदोणे मतदार संघात समाविष्ट आहेत. पंचायत निवडणुकीसाठी या तालुक्यात 33 पंचायती येत असून 13 पंचसदस्य बिनविरोध निवडून येण्यात यशस्वी झाले आहेत. साळगावचे आमदार केदार नाईक यांनी तर कमाल करून दाखविली आहे. त्यांच्या मातोश्री नयना जयप्रकाश नाईक व इतर चार उमेदवार रेईश मागुश पंचायतीत बिनविरोध निवडून आले आहेत. या तालुक्यात मंत्री व आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

कळंगुट मतदारसंघ हा मायकल लोबोंच्या अधिपत्याखाली येतो. या मतदारसंघात चार पंचायती येतात. कळंगुट, कांदोळी, पर्रा व हडफडे-नागवा. या चारही पंचायती आपल्या हातात असाव्यात म्हणून त्यांनी ‘टुगेदर फॉर’ हा ग्रुप तयार केला आहे. त्यांना जबरदस्त आव्हान देण्यासाठी भाजपाचे गोरखनाथ मांद्रेकर यांनी पर्रा युनायटेड नावाचे पॅनेल पर्रा पंचायतीत तयार केले आहे. काहीही करून भाजपचे पॅनेल निवडून आणून मायकलचे काँग्रेसचे पॅनेल गारद करण्याचा त्यांचा इरादा दिसतो.

शिवोली मतदार संघ काँग्रेसच्या डिलायला लोबो यांचा. या मतदारसंघात हणजूण, कायसुव, वेर्ला-काणका, आसगांव, मार्ना-शिवोली, सडये-शिवोली, ओशेल-शिवोली या 6 पंचायती येतात. या सर्व पंचायतीत आपले समर्थक उमेदवार निवडून आणण्याचा त्यांचा खटाटोप चालू आहे. हणजूण, कळंगुट आणि कांदोळी या पंचायती पर्यटन क्षेत्रात येत असल्याने या पंचायती पंचासाठी पैशांच्या खाणी आहेत. त्यामुळे प्रत्येकजण विजय मिळविण्याच्या प्रयत्नात आहे. पत्रकार रमेश नाईक हणजूण मतदारसंघात नशिब आजमावीत आहे.

संबंधित बातम्या

थिवी मतदारसंघ हा मच्छीमार मंत्री निळकंठ हळर्णकर यांचा आहे. त्यांना शह देण्याचे काम माजी आमदार किरण कांदोळकर व त्यांच्या पत्नी कविता कांदोळकर संयुक्‍तपणे करीत आहेत. कविता कांदोळकर जिल्हा पंचसदस्य असल्याने त्यांचा संपर्क सर्व पंचायतीशी आहे. त्याचा लाभ त्या उठवण्याचा प्रयत्न करतील तर मंत्री निळकंठ हळर्णकर भाजपाचे आमदार तथा मंत्री असल्याने आपली प्रतिष्ठा पणाला लावण्याचे काम करणार आहेत. या मतदारसंघात कोलवाळ, कामुर्ली, रेवोडा, नादोडा, पीर्णा, अस्नोडा, शिरसई व थिवी अशा आठ पंचायती येतात. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार सदानंद तानावडे यांचाही या पंचायत क्षेत्रात जुना संपर्क आहे. त्यामुळे पाहूया जनता कुणाच्या पारड्यात अधिक मते टाकते.

हळदोणे मतदारसंघात सहा पंचायती येतात. मयडे, अस्नोडा, हळदोणे, वालावली-पोंबुर्फा, उसकई, पालये, पुनोळा व बस्तोडा. या पंचायतीवर माजी आमदार ग्लेन टिकलो यांचे वर्चस्व होते. परंतु गेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेने काँग्रेसचे अ‍ॅड. कार्लुस फेरैरा यांना विजयी केले. त्यामुळे या पंचायतींवर कोणाचे प्रभुत्व राहील सांगता यायचे नाही. शिवाय म.गो.चे. माजी कार्यकारी सदस्य महेश साटेलकर यांनीही काही पंचायती आपल्या हातात आणण्यासाठी उमेदवारांना पाठिंबा दिल्याचे समजते. आमदार कार्लुस फेरैरा आपल्या परीने प्रयत्नशील आहेत.

पर्वरी मतदार संघात तीन मोठ्या पंचायतींचा समावेश आहे. सुकूर, साल्वादोर द मुंद आणि पेन्ह द फ्रांस. विद्यमान आमदार तथा मंत्री रोहन खंवटे हे गेल्या तीन निवडणुकात येथील आमदार आहेत. आधी अपक्ष उमेदवार तर आता भाजपाचे आमदार असल्याने त्यांचे पारडे बरेच जड वाटते. भाजपाचे अनेक कार्यकर्ते निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. परंतु मंत्र्यांचा पाठिंबा ज्याला मिळेल तोच पंच म्हणून निवडून येईल. बहुतेक जण भाजपाचेच कार्यकर्ते असल्याने एकट्याला जाहीर पाठिंबा देणे अन्यायकारक ठरेल, त्यामुळे छुपा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.

साळगाव मतदारसंघात सांगोल्डा, साळगाव, पिळर्ण, मार्रा, नेरुळ, रेईश मागुश व गिरी अशा सहा पंचायती येतात. एकट्या रेईश मागुश या पंचायतीत सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले. त्यातील पाच जण आमदार आमदार केदार नाईक यांचे पुरस्कर्ते आहेत. त्यात त्यांच्या मातोश्रीही आहेत. काँग्रेस पक्षाचे आमदार असूनही त्यांनी या मतदारसंघात आपले प्राबल्य राखले आहे. त्यांची लोकप्रियता वाखाणण्यासारखी आहे. या मतदारसंघातील बहुतेक पंचायती त्यांच्या हातात राहतील, असे वाटते. परंतु विद्यमान सरकार अनेक प्रकारांनी भाजपचे कार्यकर्ते निवडून येण्यासाठी प्रयत्न करेल. माजी आमदार दिलीप परुळेकरही या उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील, अशी अपेक्षा आहे.

33 पंचायतींमध्ये होणार लढती
बार्देश तालुक्यातील 33 पंचायतींसाठी 995 उमेदवार आपले नशिब आजमावीत 279 प्रभागांतून पंचायत निवडणूक लढवित आहेत. पाहुया कुणाच्या ओंजळीत किती मते जनता टाकते व किती आमदार आपले वर्चस्व अबाधित ठेऊ शकतात ते. घोडा मैदान जवळ आहे. दि. 10 ऑगस्टला भवितव्यावर शिक्‍कामोर्तब होईल.

Back to top button